कोकण रेल्वेवर विद्युत इंजिनाची यशस्वी चाचणी करण्यात आली आहे. ठोकूर ते उडुपी दरम्यान ही पहिली विद्युतीकरणाची चाचणी झाली करण्यात आली आहे. आतापर्यंत कोकण रेल्वे फक्त डिझेल आणि इंजिनवर धावत होती पण आता लवकरच कोकण रेल्वे विद्युत इंजिनाच्या सहाय्याने धावण्याची शक्यता आहे. कोकण रेल्वे मार्गावरील विद्युतीकरणाचे काम युध्दपातळीवर सुरु असून आतापर्यंत सुमारे ४५ ते ५० टक्के काम पूर्ण झाले आहे. दोन दिवसांपूर्वी ठोकुर ते उडपी दरम्यान इलेक्ट्रीक लोकोची यशस्वी चाचणी करण्यात आली. या मार्गावर लवकरच वाहतूक सुरु करण्यात येणार आहे. ७४० किमीच्या या रेल्वे मार्गाचे डिसेंबर २०२० पर्यंत विद्युतीकरणाने पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असून त्यासाठी ११०० कोटीचा खर्च आहे. दऱ्या-खोऱ्यामधून मार्ग काढत कोकणात आणलेल्या रेल्वेचे विद्युतीकरण आणि दुपदरीकरण वेगाने सुरु आहे. एकपदरी मार्ग असला तरीही दिवसाला तीसहून अधिक गाड्या धावत आहेत. मुंबईहून गोवा, कर्नाटककडे जाणाऱ्या गाड्यांचे प्रमाण अधिक आहे. वाढती गर्दी लक्षात घेऊन कोकण रेल्वेचे विद्युतीकरणालाही रेल्वे मंत्रालयाने मान्यता दिली. त्यासाठी दोन कंपन्यांची नियुक्ती केली असून रोहा ते वेरणापर्यंत एल अॅण्ड टी व वेरणा ते ठोकुरपर्यंत कल्पतरू पॉवर ट्रान्समिशन या ठेकेदार कंपन्या काम करत आहेत. कोकण रेल्वे मार्गावरील ओव्हरहेड वायर, ट्रान्समिशनसाठी पॉवर स्टेशन व ओव्हरहेड वायरसाठीचे खांब उभारणीचे काम सध्या वेगाने सुरू आहे. विद्युतीकरणामुळे येत्या काळात कोकण रेल्वेमार्गावरून धावणाऱ्या रेल्वेला गती मिळण्यासोबतच रेल्वेसाठी वापर होणाऱ्या डिझेलच्या वापरावर नियंत्रण येणार आहे. त्यातून इंधन बचत व पर्यायाने रेल्वेचे शेकडो कोटी रुपये वाचणार आहेत. रत्नागिरीमध्ये सबस्टेशन उभारण्यात येत असून कामही पूर्ण झाले आहेत. कोकण रेल्वे मार्गावर ठोकुर ते उडपी या भागातील विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. दोनच दिवसांपूर्वी इलेक्ट्रीकचे लोको चालवून पाहण्यात आले. ही चाचणी यशस्वी झाल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले. अजून दोन ते तीन चाचण्या केल्यानंतर या मार्गावर नियमित गाडी सोडण्यात येणार आहे. त्याबाबत लवकरच निर्णय होईल असे सांगण्यात आले.
