जनतेच्या समस्यांच्या पूर्ततेसाठी जनआंदोलनाचा समविचारीचा इशारा

0

रत्नागिरी : जनसामान्यांच्या मनात खदखदत असलेले आणि ऐरणीवरील असंख्य विषय महाराष्ट्र समविचारी मंचच्या माध्यमातून संबंधित शासकीय यंत्रणेला कळवत असून त्याला काही प्रमाणात यश येत आहे. त्यातील काही दुर्लक्षित विषयांवर लॉकडाउन संपताच शांततामय मार्गाने आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा मंचाचे राज्य सरचिटणीस संजय पुनसकर यांनी दिला आहे. श्री. पुनसकर म्हणाले, जिल्हा प्रशासनसह थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत आणि संबंधित मंत्र्यांनाही निवेदन दिली गेली आहेत. अनेक दुर्लक्षित पण गांभीर्य असलेले विषय आम्ही घेतले. हे विषय सामाजिक दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहेत. राज्यकर्ते आणि लोकप्रतिनिधी यांनी याकामी खरे तर लक्ष द्यायला हवे. असे असताना अक्षम्य दुर्लक्ष होते, ही बाब जनतेने आणि समाजाभिमुख काम करणाऱ्यांनी दुर्लक्षित करण्यायोग्य नाही. सर्वसामान्य नागरिक विषय सुचवतात. आम्ही ते महाराष्ट्र समविचारी मंचाच्या वतीने त्या त्या शासकीय विभागासह जिल्हा प्रशासनापर्यंत मांडतो. कित्येक विषय राज्य स्तरावरील असतात. त्या विषयाचे महत्त्व ध्यानी घेऊन आम्ही मुख्यमंत्र्यांना कळवतो. असे असताना संबंधित शासकीय विभाग चालढकल करीत असल्याचे दिसून येत आहे. याबाबत समविचारीच्या राज्यस्तरीय बैठकीत या प्रश्नावर लॉकडाउन संपताच उपोषण, मोर्चे, निदर्शने आदी मार्गांचा अवलंब करण्याचे ठरविण्यात आल्याचेही पुनसकर यांनी सांगितले. दरम्यान, समविचारी संघटना राज्यभरात बळकट होत असून राज्यात २८ महिला जिल्हाध्यक्ष तर ३२ पुरुष जिल्हाध्यक्ष नेमण्यात आले आहेत. विशेष म्हणजे त्यातील १६ पदाधिकारी नामवंत वकील आहेत. हे सर्व जिल्हाध्यक्ष आपापल्या विभागातील प्रश्न मांडत असून राज्यस्तरीय प्रश्नांवर एकत्र काम करीत असल्याने संघटनेच्या कामाला गती आली आहे. यापुढे विविध विषय मार्गस्थ होण्यासाठी सनदशीर मार्गाने आंदोलन सुरू करणार असून याकामी समविचारीचे प्रमुख आणि माजी उपनगराध्यक्ष बाबा ढोल्ये यांचे उत्तम मार्गदर्शन मिळत असल्याचे श्री. पुनसकर यांनी शेवटी सांगितले.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
2:58 PM 10-Jun-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here