डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येसाठी वापरण्यात आलेले पिस्तूल खाडी पात्रात फेकण्यात आले आहे. हे हत्यार शोधण्यासाठी आवश्यक त्या परवानग्या मिळाल्या असून या कामासही सुरुवात करण्यात आली आहे. परंतु पिस्तूल शोधण्यासाठी आणखी 15 दिवसांची मुदतवाढ देण्यात यावी अशी विनंती सीबीआयच्या वतीने आज हायकोर्टात करण्यात आली. कोल्हापूर येथे फेब्रुवारी 2015 साली कॉ. गोविंद पानसरे यांची गोळय़ा झाडून हत्या करण्यात आली होती तर नरेंद्र दाभोलकर यांचाही अज्ञात मारेकऱयांनी ऑगस्ट 2013 साली खून केला होता. याप्रकरणी दाभोलकर-पानसरे कुटुंबीयांनी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती रियाज छागला यांच्या खंडपीठासमोर गुरुवारी याप्रकरणी सुनावणी घेण्यात आली. त्या वेळी तपास यंत्रणांच्या वतीने कोर्टाला माहिती देण्यात आली की, खाडी पात्रातील पिस्तूल शोधण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी पानबुडीची मदत घेण्यात येत आहे. पिस्तूल शोधण्यासाठी आणखी 15 दिवसांचा अवधी लागेल. हायकोर्टाने त्यास मंजुरी देत सुनावणी तहकूब केली.
