रिझर्व्ह बँकेत असिस्टंट पदासाठी तर स्टेट बँकेत कारकून पदासाठी भरती होणार आहे. या दोन्ही बँकांची पूर्व प्राथमिक परीक्षा एकाचवेळी म्हणजेच 14 आणि 15 फेब्रुवारीला होणार आहे. जे उमेदवार दोन्ही परिक्षांना बसणार आहेत कदाचित त्यांना एका परिक्षेला मुकावे लागणार आहे. या पार्श्वभूमीवर पूर्व प्राथमिक लेखी परिक्षेच्या वेळापत्रकात बदल करावा किंवा दोन्ही बँकेत अर्ज केलेल्या उमेदवारांना परिक्षेला बसण्यास संधी मिळावी यासाठी दोन्ही दिवशी दोन ते तीन सत्रात परिक्षेचे वेळापत्रक निश्चित करावे अशी मागणी स्थानिक लोकाधिकार समिती महासंघाने आयबीपीएसकडे केली आहे. रिझर्व्ह बँकेत असिस्टंट या पदासाठी 926 जागांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. तर स्टेट बँक ऑफ इंडियात कारकून पदासाठी 8 हजार जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले आहेत.
