नवी मुंबई : गेल्या तीन महिन्यांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते गणेश नाईक, आमदार संदीप नाईक आणि ५७ नगरसेवक भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू आहे. मात्र याबाबत गणेश नाईक आणि ५७ नगससेवक पहिल्यांदा या पक्षांतराच्या विषयावर चर्चा करण्यासाठी एकत्र येत आहेत. यासाठी पारसिक हिलवर महापौर बंगल्यावर या गेट टूगेदर बैठकीचे आयोजन खुद्द महापौर जयवंत सुतार यांनी केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नवी मुंबई महापालिकेत ५२ नगरसेवक आहेत. शिवाय ५ अपक्ष नगरसेवकांचा नाईकांना सुरूवातीपासून पाठिंबा आहे. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची संख्या ५७ होते. गणेश नाईकांकडे पालिकेची सत्ता २५ वर्षापासून एकहाती आहे. शिवसेनेतून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेल्यानंतर केवळ भगवा झेंडा जाऊन घड्याळ झळकले. मात्र, त्याचवेळी शिवसेनेच्या सिताराम भोईर यांनी गणेश नाईक यांचा बेलापूर मतदारसंघातून पराभव केला. हा पराभव नाईकांच्या जिव्हारी लागला होता. मात्र खचून न जाता त्यावेळी गणेश नाईक यांनी महापालिकेवर सत्ता मिळवली ती आजपर्यंत एकहाती आहे. २०१४ मध्ये दुसर्यांदा गणेश नाईक यांचा भाजप आमदार मंदा म्हात्रे यांच्याकडून पराभव झाला. मात्र ऐरोली विधानसभा मतदारसंघांतून त्यांचे पुत्र संदीप नाईक यांचा विजयश्री खेचून आणला. लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे राजन विचारे यांच्याकडून २०१४ मध्ये संजीव नाईक यांचाही पराभव झाला. त्यामुळे २०१९ मध्ये संजीव नाईक यांना बाजूला ठेवत आनंद परांजपे यांना खासदारकीचे तिकिट राष्ट्रवादी काँग्रेसने दिले आणि सर्व जबाबदारी गणेश नाईक यांच्यावर सोपवली. मात्र, परांजपे यांचा पराभव झाला आणि शिवसेनेने ही जागा कायम आपल्याकडे ठेवण्यात यश मिळवले. मात्र त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमध्ये गळती सुरू झाली ती अजूनही सुरू आहे. अनेक दिग्गजांनी निवडणूक आधी आणि निकालानंतर भाजप, शिवसेनेत जाण्याची तयारी केली. नेत्यांची भेट घेऊन पक्षप्रवेश निश्चित झाले आणि हाता कमळ तर खांद्यावर धनुष्य बाण घेतले. काही मंत्री झाले. वातावरण युतीला पोषक असल्यानेच राष्ट्रवादी व काँग्रेसमधील नेते भाजमध्ये जात आहेत. पुढे विधानसभा आणि नंतर महापालिका निवडणुकीत फटका बसू शकतो. यामुळे आताच निर्णय घ्यावा लागेल. यासाठी नवी मुंबईतील १३ नगरसेवकांचा गट तयार झाला. मात्र स्पष्ट भूमिका गणेश नाईक यांच्यासमोर मांडण्याची हिंमत कुणाचीच अजून झाली नाही. फ्री मिटिंग दरम्यान महापौर जयवंत सुतार, माजी स्थायी समिती सभापती सुरेश कुलकर्णी यांनी राजकीय वातावरण पाहता निर्णय घ्यावा ‘दादा” असे सूचक विधान केले होते. ही बैठक क्रिस्टल हाऊसवर झाली होती. मात्र त्याचवेळी उपस्थित नगरसेवकांसमोर गणेश नाईक यांनी ज्याला जायचे आहे त्यांनी खुशाल जा असे वक्तव्य केल्याने खळबळ उडाली होती. मी राष्ट्रवादी काँग्रेस आणि नेते शरद पवार यांना सोडून जाणार नाही ही भूमिका कायम होती. त्यामुळे त्यांच्यावर दबाव टाकण्यासाठी महापालिकेत एका गटातील नगरसेवकांनी बैठक घेऊन आपण भाजपमध्ये जाणार आहोत असा निर्णय घेतला. याच कारणासाठी त्यांना मोजक्या नगरसेवकांना फोनाफोनी केली होती. त्यामध्ये जिल्हाध्यक्ष अनंत सुतार यांना ही तो फोन आला होता. यामुळे नवी मुंबईतील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले. याबाबत रविवारी रात्री आमदार संदीप नाईक आणि गणेश नाईक, माजी खासदार संजीव नाईक, महापौर जयवंत सुतार, जिल्हाध्यक्ष अनंत सुतार यांच्यात चर्चा होऊन सोमवारी आज सकाळी १२ वाजता पारसिक हिलवर महापौर बंगल्यावर बैठक घेण्याचा निर्णय घेतला. याबैठकीची फोन महापौर कार्यालयातून आज सकाळी नऊ वाजता नगरसेवकांना करण्यात आले. त्यावेळी गेट टूगेदर करण्यासाठी बैठक असल्याचे सांगितले. बैठकीनंतर खरे चित्र स्पष्ट होणार आहे.

.