मिऱ्या बंधाऱ्याच्या देखभालसाठी पुण्याच्या ‘मोनार्च’ वर जबाबदारी

0

मिऱ्या धूपप्रतिबंधक बंधाऱ्याच्या कामाला हळूहळू गती येऊ लागली आहे. १९० कोटी खर्च करून बांधण्यात येणाऱ्या या बंधाऱ्यासाठी ‘कन्सल्टंट’ म्हणून पुण्याच्या कंपनीची नियुक्ती करण्यात येणार आहे. ‘मोनार्च’ असे या कंपनीचे नाव असून या कंपनीला ४ कोटी ३२ लाख रूपये मोजण्यात येणार आहेत. बंधारा बांधून झाल्यानंतर पुढील दहा वर्षे देखभाल आणि दुरूस्ती करून घेण्याची जबाबदारी या कन्सल्टंट कंपनीवर असणार असल्याची माहिती पतनचे एस.ए. हुनेरकर यांनी दिली. मिऱ्या धूपप्रतिबंधक बंधाऱ्याची प्रत्येक पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणावर धूप होत आहे. आता तर समुद्राचे पाणी थेट स्थानिक ग्रामस्थांच्या कंपाऊंडमध्ये घुसू लागले आहे. उधाणाच्या कालावधीत समुद्राचे पाणी या भागात शिरण्याची भीती निर्माण झाल्याने स्थानिकांच्या मनात धडकी भरते. गतवर्षी मिऱ्या बंधाऱ्याला उधाणाचा सर्वाधिक फटका बसला होता. यामुळे मिऱ्या बंधाऱ्याची कायमस्वरूपी दुरूस्ती व्हावी, यासाठी स्थानिकांनी गतवर्षी ६ जानेवारीला आंदोलन छेडले. त्यांच्या या आंदोलनाला यश आले. मिऱ्या बंधाऱ्याची कायमस्वरूपी दुरुस्ती होण्यासाठी शासनाने १९० कोटी रुपये मंजूर केले. मरीन ड्राईव्हच्या धरतीवर हा बंधारा बांधण्यात येणार आहे. मात्र अजून कन्सल्टंट कंपनीची नियुक्ती न झाल्यामुळे काम थांबले होते. दरम्यान, शासनाने कन्सल्टंट कंपनीची नियुक्ती केली आहे. त्यासाठी सुमारे ४ कोटी ३२ लाख रुपये कंपनीला देण्यात येणार आहे. पुण्यातील ‘मोनार्च’ कंपनी मिऱ्या बंधाऱ्याचे सर्व काम पाहणार आहे. बंधारा शंभर मीटर पाण्यातून सुरू होणार आहे. त्याचा पाया मजबुत राहावा, धूप होऊन वाळू अन्यत्र जाऊ नये, यासाठी विशिष्ट बांधणी केली जाणार आहे. बंधारा बांधताना ‘गोयन’ तंत्राचा वापर केला जाणार आहे. तसेच बंधारा बांधताना २०० ते ३०० किलोचे टेट्रापॉड टाकले जाणार आहेत. जमिनीपासून हा धूपप्रतिबंधक बंधारा सुमारे अडिच मीटर उंच असणार आहे. कन्सल्टंट कंपनी नेमल्यानंतर बंधाऱ्याची संपूर्ण जबाबदारी या कंपनीची राहणार आहे. तसेच पुढील १० वर्षापर्यंतची देखभाल दुरूस्तीची जबाबदारी देखील मोनार्च कंपनीचीच राहिल. या कालावधीत काही प्रश्न निर्माण झाल्यास त्याची सोडवणूक ठेकेदारामार्फत करून घेणे ही कन्सल्टंट कंपनीची जबाबदारी राहणार आहे.

HTML tutorial

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here