राजधानी दिल्लीतील विधानसभा निवडणुकीला जोर चढण्यास सुरुवात झाली आहे. आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांना कोणत्याही परिस्थितीत रोखण्यासाठी काँग्रेस आणि भाजपकडून रणनिती तयारी करण्यात येत आहे. केजरीवाल यांच्या नवी दिल्ली मतदार संघात काँग्रेसकडून माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांच्या कन्या लतिका दीक्षित मैदानात उतरण्याची शक्यता आहे. तर भाजपकडून माजी केंद्रीय विदेशमंत्री सुषमा स्वराज यांच्या कन्या बासुरी स्वराज यांना भाजपकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. नवी दिल्लीतील नोकरशहा व उच्च मध्यमवर्गीय मतदार लक्षात घेता बासुरी यांच्या नावाबाबत स्वतः मोदी आशावादी असल्याचे पक्षनेते सांगतात. विशेषतः या भागात सुषमा स्वराज यांच्याबाबत प्रचंड सहानुभूती व जिव्हाळा असलेले मतदार बहुसंख्येने आहेत. त्याचाही लाभ बासुरी यांना होऊ शकतो असे भाजप नेते मानतात. दरम्यान, दिल्ली विधानसभेसाठी ८ फेब्रुवारीला मतदान होणार असून मतमोजणी या ११ फेब्रुवारी रोजी होणार आहे. आजपासूनच निवडणूक आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. एकाच टप्पात निवडणूक होणार असून या निवडणुकीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.
