टीम इंडियात रिषभ पंतच्या जागी कोणाची वर्णी ?

0

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातला दुसरा वन डे सामना आज राजकोटच्या सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. पहिल्या सामन्यात रिषभ पंत दुखापतग्रस्त झाला होता आणि त्यामुळे त्याच्या जागी लोकेश राहुलनं यष्टिरक्षकाची जबाबदारी पार पाडली होती. रिषभ दुसऱ्या सामन्यात खेळणार नसल्याचं बीसीसीआयनं आधीच स्पष्ट केल्यानं आजच्या सामन्यातही लोकेश राहुल यष्टिंमागे दिसण्याची शक्यता आहे. पण, बीसीसीआयनं रिषभच्या जागी नव्या यष्टिरक्षकाचा संघात समावेश केला आहे. या यष्टिरक्षकाचे नाव ऐकून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल. वानखेडेवर झालेल्या पहिल्या वन डे सामन्यात यजमान भारताला मानहानिकारक पराभव पत्करावा लागला. भारतानं ठेवलेले 256 धावांचे लक्ष्य ऑस्ट्रेलियानं एकही विकेट न गमावता पार केले. डेव्हिड वॉर्नर आणि अॅरोन फिंच यांनी शतकी खेळी केली. या सामन्यात पंत दुखापतग्रस्त झाला होता आणि तो मैदानावर क्षेत्ररक्षणासाठीही आला नाही. त्याच्या जागी लोकेश राहुलनं यष्टिरक्षण केले. पॅट कमिन्सच्या गोलंदाजीवर चेंडू पंतच्या हेल्मेटवर आदळला होता. त्यामुळे सामन्यानंतर त्याला तातडीनं हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले होते. तो मंगळवारी संघासोबत राजकोटला न जाता मुंबईतच थांबला होता. त्याला बुधवारी हॉस्पिटलमधून डिस्चार्ज केले आणि आता तो पुढील देखरेखीसाठी बंगळुरूच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत दाखल झाला आहे. त्यामुळे पंत दुसऱ्या वन डे सामन्यात खेळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. तिसऱ्या वन डे बाबतचा निर्णय पंतच्या तंदुरुस्तीवर अबलंबून आहे. टीम इंडियानं या मालिकेसाठी संघनिवड करताना राखीव यष्टिरक्षकाची निवड केली नव्हती. त्यामुळे पंतनं दुसऱ्या वन डेतून माघार घेतल्यानंतर यष्टिरक्षकाची जबाबदारी लोकेश राहुलकडे दिली जाऊ शकते. पण, आता बीसीसीआयनं संघात राखीव यष्टिरक्षक म्हणून केएस भरतची निवड केली आहे. हैदराबाद येथे असलेल्या भरतला तातडीनं राजकोट येथे बोलावण्यात आले आहे. आजच्या सामन्यात त्याची खेळण्याची शक्यता नाहीच आहे. लोकेश दुखापतग्रस्त झाल्यास बॅकअप म्हणून भरतला बोलावले आहे. भरतनं 74 प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 4143 धावा चोपल्या आहेत. त्याच्या नावावर त्रिशतकही आहे. शिवाय यष्टिमागे त्याने 254 झेल आणि 27 स्टम्पिंगही केल्या आहेत.

HTML tutorial

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here