पुणे फिल्म फाउंडेशन आणि महाराष्ट्र शासन यांच्या वतीने आयोजित १८ व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘आनंदी गोपाळ’ या चित्रपटाने या वर्षीच्या ‘संत तुकाराम आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपट’ पुरस्कारावर आपली मोहोर उमटविली. तर ट्यूनिशियनच्या ‘अ सन’ या चित्रपटाने ‘प्रभात सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कारा’वर आपले नाव कोरले. गेल्या आठवडाभरापासून देश-विदेशातील विविध चित्रपटांची मेजवानी देणाऱ्या ‘पिफ’चा दिमाखदार सांगता सोहळा राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय येथे रंगला. ‘संत तुकाराम आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपट पुरस्कारा’चे स्वरूप रोख रुपये पाच लाख, सन्मानचिन्ह, तर ‘प्रभात सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कारा’चे स्वरूप सन्मानपत्र, रोख रुपये दहा लाख, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र आहे. हे दोन्ही पुरस्कार दरवर्षी राज्य शासनाच्या वतीने प्रदान करण्यात येतात. या पुरस्कारांची घोषणा महोत्सवाचे अध्यक्ष आणि संचालक डॉ. जब्बार पटेल यांनी समारोपाच्या कार्यक्रमात केली.
