आंब्याबरोबरच यावर्षी काजू पिकही प्रतिकूल हवामानाचे शिकार ठरत आहे. फवारणी न झालेले काजू पीक धोक्यात आले आहे. काजूचे यंदा जेमतेम 50 टक्के उत्पादन हाती येईल, असा अंदाज व्यक्त होत आहे. नोव्हेंबरपासून पडणारी थंडी यावर्षी आता दोन दिवसांपूर्वीपासून पडू लागल्याने काजूचे उत्पादन उशीरा येण्याबरोबरच घटणार असल्याची भीती काजू उत्पादक भास्कर भागवत यांनी व्यक्त केली आहे. कोकणात आंबा आणि काजू ही दोन्ही पिके शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीस हातभार लावण्यासाठी खूप महत्त्वाची ठरतात. मात्र प्रतिकूल हवामान, वादळ सदृश स्थिती याचबरोबर सातत्याने असणारे मळभ याचा परिणाम काजूला तसेच आंब्याला मोहोर येण्याच्या प्रक्रियेवर झाला. पहिल्या टप्प्यातील मोहर येण्यास जवळपास जानेवारी महिना उजाडला आणि हा मोहर ढगाळ हवामानामुळे काळा पडून गळून गेला. गेल्या दोन दिवसांपासून कोकणात थंडीचा जोर वाढला असल्याने आता नव्याने मोहोर येण्यास प्रारंभ होणार असला तरी काजू आणि आंब्याचा हंगाम थेट दोन महिने लांबणीवर पडणार आहे. काजू पिकाला सातत्यपूर्ण थंडी मिळत नसल्याने याचा परिणाम मोहर प्रक्रिया आणि फळ धारणेवर झालेला दिसून येत आहे. मात्र उशिराच्या हंगामा नंतरही बऱ्याच ठिकाणी ढगाळ वातावरणामुळे टी मॉस्क्युटो किडीचा प्रादुर्भाव झालेला दिसून येत आहे. अनेक ठिकाणी मोहराचा फुलोरा होण्यापूर्वी या रोगाची लागण झाल्याने हे काजू पीक संकटात सापडले आहे. सुरुवातीच्या टप्प्यात आलेल्या मोहरावर खार पडल्याने हा मोहर काळा पडून जळून गेला. ज्या ठिकाणी फवारणी योग्य पद्धतीने झाली नाही तसेच आवश्यक त्यावेळी पुरेशी थंडी न मिळाल्यामुळे मोहर सुकून पुन्हा पालवी आली. याचा फटका आता थेट काजू उत्पादनावर दिसून येणार आहे. शेतकऱ्यांच्या आणि बागायतदारांच्या मते गतवर्षीच्या तुलनेत यंदा काजूचे उत्पादन 50 टक्क्यांनी घटणार आहे. बागायतदारांनी अनेक ठिकाणी फवारणी करून काजू उत्पन्न वाढविण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याला फारसे यश आलेले नाही. गेल्या दोन दिवसांपासून पडणाऱ्या थंडीने मोहर प्रक्रिया गतिमान झाली आहे. ही थंडीची प्रक्रिया कायम राहिली तर याचा काही अंशी लाभ होण्याची आशा बागायतदारांना वाटत आहे. वातावरणाच्या विपरीत परिणामामुळे यावर्षी पिकाला अपेक्षित दर मिळेल की नाही याबाबतही शेतकरी चिंतेत आहेत. काजूच्या उत्पादनावर परिणाम झाला की, कारखानदार परदेशी काजू बी ची आयात करतात. यामुळे बाजारपेठतील मागणी घटली तर काजू बीचा दर कोसळण्याची देखील भीती व्यक्त करण्यात येत आहे. गतवर्षी काजूचा दर 150 ते 155 रुपयांवर पोहचला होता. यावर्षी मात्र हा दर किलोला 120 रुपयांवर स्थिर राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
