भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात दुसरा वनडे सामना सुरु आहे. सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, राजकोट येथे सुरु असलेल्या या सामन्यात खेळताना भारताचा उपकर्णधार रोहित शर्माने एक मोठा विश्वविक्रम केला आहे. रोहितने या सामन्यात खेळताना सलामीवीर फलंदाज म्हणून वनडेत 7000 धावांचा टप्पा पार केला आहे. त्याने 137 व्या वनडे डावात सलामीला खेळताना हा टप्पा पार केला आहे. त्यामुळे तो वनडेमध्ये सर्वात जलद 7000 धावा करणारा सलामीवीर फलंदाज ठरला आहे. त्याने हा पराक्रम करताना दक्षिण आफ्रिकेचा माजी सलामीवीर फलंदाज हाशिम अमलाला मागे टाकले आहे. अमलाने 147 डावात सलामीला फलंदाजी करताना 7000 वनडे धावांचा टप्पा पार केला होता. रोहित आज 44 चेंडूत 42 धावांवर बाद झाला. त्याला ऍडम झम्पाने पायचीत बाद केले. त्यामुळे आता रोहितच्या 137 वनडे डावात सलामीला फलंदाजी करताना 7029 धावा झाल्या आहेत. रोहितने आणि शिखरने आज भारताला चांगली सुरुवात करुन दिली होती. त्यांनी पहिल्या विकेटसाठी 81 धावांची भागीदारी रचली आहे. मात्र रोहित बाद झाल्याने ही भागीदारी तुटली.
