रत्नागिरी : शिक्षक भरतीचा शासकीय अध्यादेश 23 जून 2017 रोजी जारी होऊन तब्बल दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. डिसेंबर 2017 मध्ये भरतीची परीक्षा झाली. फेब्रुवारी 2019 मध्ये बारा हजार एक जागांची जाहिरात प्रकाशित करण्यात आली. तब्बल दोन वर्षे उलटली असतानाही अद्याप भरती प्रक्रिया मात्र पूर्ण झालेली नाही. त्यामुळे या भरतीची आता सोशल मीडियावर खिल्ली उडवली जात आहे. शिक्षक भरतीच्या पारदर्शकतेसाठी पवित्र पोर्टल निर्माण करण्यात आले खरे मात्र दररोज नवनवीन शासकीय जीआर तसेच न्यायालयाचे निर्णय यांच्या नावाखाली गेल्या दोन वर्षापासून बेरोजगारांची क्रूर चेष्टा शासनाकडून चालू आहे. शिक्षण विभागाकडून मात्र अजूनही केवळ आश्वासनेच मिळत असल्याने भावी शिक्षकांमध्ये प्रचंड असंतोष खदखदत आहे. दोन वर्षांच्या कालावधी दरम्यान सरकारच्या शिक्षण विभागाने अनेक वादग्रस्त अध्यादेश काढले आहेत. यामुळे उमेदवारांवर अन्याय झाला आहे. चुकीच्या अध्यादेशाच्या विरोधात भरती उमेदवारांच्या पाच ते सहा याचिका न्यायालयात प्रलंबित आहेत. केवळ बारा हजार जागांची भरती करण्यासाठी शासनाच्या गतिमान आणि पारदर्शक कारभाराच्या नावाखाली दोन वर्षापासून डीटीएड् व बीएड् धारकांना नोकरीपासून वंचित ठेवण्यात आले आहे. इतर विभागातील शेकडो जागांसाठी जरी भरती करावयाची असेल, तर एका वर्षाच्या आत पूर्ण प्रक्रिया केली जाते. परंतु शिक्षण विभागात मात्र केवळ बारा हजार जागांच्या भरतीसाठी दोन वर्षे इतका प्रचंड कालखंड का लागला? याचे कोडे मात्र लाखो अभियोग्यताधारकांना उलगडलेले नाही. येत्या विधानसभा निवडणुकीपूर्वी भरती न झाल्यास निवडणुकीत या सरकारला धडा शिकविण्यासाठी सर्व अभियोग्यताधारक रस्त्यावर उतरणार आहेत. 2 ऑगस्ट रोजी भरतीबाबत पुढील सूचना प्रसिद्ध करण्यात येतील, अशी सूचना सध्या पवित्र पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यामुळे लाखो उमेदवारांचे लक्ष 2 रोजीच्या सूचनेकडे लागले आहे.
