‘तीन वर्षांनंतरच्या निवडणुका स्वबळावर लढणार’

0

चिपळूण : देशभरात तळागाळातील लाेकांपर्यंत काँग्रेस पक्ष पोहोचला आहे. काँग्रेस पक्षाशी जोडलेले घटक गेल्या काही वर्षांत दुरावलेले आहेत. त्यांना पुन्हा संघटित करण्याचे काम सुरू आहे. पुढे तीन वर्षांनंतर होणाऱ्या निवडणुका स्वबळावर लढण्याचे धोरण सुरू आहे. मुख्यमंत्री काँग्रेसचा बसावा, ही आमची भूमिका आहे. देशपातळीवर भाजपला केवळ काँग्रेस हाच सक्षम पर्याय आहे. त्यासाठीच तळागाळात पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी सर्व नेत्यांचे दौरे सुरू असल्याचे मत काँग्रेसचे ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. पक्ष संघटन वाढीकरिता जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी ते दौऱ्यावर आले आहेत. कापसाळ येथील विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते म्हणाले की, काँग्रेसच्या वरिष्ठांनी महाराष्ट्रात पक्ष संघटन मजबूत करण्याच्या सूचना दिल्या आहेत. बारा बलुतेदारांचा घटक वर्षानुवर्षे काँग्रेससोबत जोडलेला होता. मात्र, काही राजकीय पक्षांनी या घटकाची दिशाभूल केल्याने ते पक्षापासून दुरावले आहेत. त्यांना संघटित करण्याचे काम सुरू आहे. केंद्र सरकार खासगीकरणाची भूमिका घेत असून, सरकारी कंपन्या, उद्योग बंद करण्याचा सपाटा लावला आहे. सरकारी कंपन्या शिल्लक राहत नसल्याने तिथे ओबीसींना आरक्षण मिळत नाही. हे केंद्र सरकार ओबीसींच्या विरोधात निर्णय घेत असल्याची टीका त्यांनी केली. प्रत्येक राजकीय पक्ष विस्तार करण्यासाठी धडपडत आहे. काँग्रेसने स्वबळाची भूमिका घेण्याचे ठरवले आहे. या धोरणामुळे महाविकास आघाडीत बिघाडी निर्माण होणार नाही. विधानसभा निवडणुकीला तीन वर्षांचा कालावधी शिल्लक आहे. त्यामुळेच आगामी निवडणुकीसाठी सध्या मशागत करण्याचे काम तळागाळातील कार्यकर्त्यांकडून केले जात आहे, असे त्यांनी सांगितले. चिपळूणसह जिल्ह्यात काँग्रेसमध्ये नेहमीच गटतट होते. पक्षवाढीसाठी झटणारे तालुकाध्यक्ष प्रशांत यादव यांना जाणीवपूर्वक लक्ष्य केले जाते. यावर ते म्हणाले की, गटतट ही बाब जिवंत असल्याची लक्षणे आहेत. घर म्हणजे भांड्याला भांडे लागणारच. राज्यात पक्ष बळकट करावयाचा असल्याने सर्वांना सोबत घेऊनच काम करावे लागेल. जिल्हाध्यक्ष प्रकाश साळवी यांनी दिलेला राजीनामा मंजूर झालेला नाही. सध्या त्यांच्याकडेच जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी आहे. पक्षवाढीसाठी त्यांना पुढील काळात ताकद देण्यात येईल.
यावेळी प्रदेशाध्यक्ष माळी यांचे आगमन होताच तालुकाध्यक्ष प्रशांत यादव व त्यांच्या सहकाऱ्यांनी फटाक्यांच्या आतषबाजीने जल्लोषात स्वागत केले. यावेळी ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष प्रकाश साळवी, युवक शहराध्यक्ष फैसल पिलपिले, महेश कदम यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:44 PM 16-Jun-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here