एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत दापोली, खेड आणि मंडणगड तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. सातारा जिल्ह्यातील वाई येथे शेतकऱ्यांकरिता प्रत्यक्ष शेतावरील प्रशिक्षण प्रक्षेत्र प्रशिक्षणाचा हा कार्यक्रम येत्या २१ ते २५ जानेवारी या कालावधीत राबविण्यात येणार आहे. खेड तालुक्यातील ३३, दापोली तालुक्यातील ३४, तर मंडणगड तालुक्यातील ३३ शेतकऱ्यांसाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. प्रशिक्षण कार्यक्रमासाठी फळबाग, फुले, भाजीपाला लागवड, प्राथमिक प्रक्रिया केंद्र, संरक्षित शेतीअंतर्गत ग्रीन हाऊस, शेडनेट हाऊस, प्लास्टिक मल्चिंग इत्यादी घटकांचा लाभ घेतलेल्या आणि लाभ घेऊ इच्छित असलेल्या शेतकऱ्यांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. यामध्ये महिला, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना प्राधान्य देण्यात येणार आहे. प्रशिक्षणासाठी प्रतिशेतकरी प्रतिदिन एक हजार रुपये याप्रमाणे जास्तीत जास्त पाच दिवसांच्या प्रशिक्षणासाठी शासनामार्फत खर्च करण्यात येणार आहे. त्यापेक्षा अतिरिक्त खर्च झाल्यास संबंधित शेतकऱ्यांना तो करावा लागणार आहे. प्रशिक्षणार्थींची भोजन व निवास व्यवस्था वाई येथील उपविभागीय कृषि अधिकाऱ्यांच्या समन्वयाने करण्यात येणार आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या संधीचा लाभ घेऊन नवीन तंत्रज्ञान आत्मसात करावे, असे आवाहन दापोलीच्या उपविभागीय कृषि अधिकाऱ्यांनी कळविले आहे.
