कोकणातील शिर्के प्लाझा येथील उज्ज्वला क्लासेसमध्ये सीएच्या विद्यार्थ्यांकरिता आयोजित प्रशिक्षणाला प्रतिसाद

0

सीए इन्स्टिट्यूटच्या रत्नागिरी शाखेतर्फे आयोजित जीएमसीएस प्रशिक्षणामध्ये अमोली केलकर, चिन्मय पाध्ये आणि केशव माणगावकर यांनी अनुक्रमे पहिले तीन क्रमांक मिळविले. गुरुवारी सायंकाळी प्रशिक्षणाची सांगता झाली. शिर्के प्लाझा येथील उज्ज्वला क्लासेसमध्ये सीएच्या विद्यार्थ्यांकरिता गेले १५ दिवस दररोज सहा तासांचे प्रशिक्षण आयोजित केले होते. कोकणात प्रथमच असे प्रशिक्षण झाले. समारोप कार्यक्रमाला सीए इन्स्टिट्यूटचे शाखाध्यक्ष अँथोनी राजशेखर, मार्गदर्शक सीए कुशल मिश्रा, उज्ज्वला क्लासेसचे प्रमुख पुरुषोत्तम पाध्ये, सेक्रेटरी सीए आनंद पंडित उपस्थित होते. विजेत्या विद्यार्थ्यांनी सीए इन्स्टिट्यूटचे आभार मानले. सीए अँथोनी राजशेखर यांनी विद्यार्थ्यांना इंग्रजीतून भाषण सराव, वृत्तपत्रांचे वाचन करण्याविषयी मार्गदर्शन केले. सीए मिश्रा यांनी रत्नागिरीतील या पहिल्याच प्रशिक्षणाला उपस्थित राहता आल्याबद्दल आभार मानले. पाध्ये यांनी अशा प्रकारची प्रशिक्षणे आयोजित करावी, सहकार्य करू अशी ग्वाही देताना रत्नागिरीतून जास्तीत जास्त सीए तयार व्हावेत, असे सांगितले. इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया या राष्ट्रीय पातळीवरील शिखर संस्थेची रत्नागिरीत शाखा सुरू झाल्यापासून सीएच्या विद्यार्थ्यांसाठी हे तिसरे प्रशिक्षण होते. जीएमसीएस प्रशिक्षणात विद्यार्थ्यांचा सहभाग लक्षणीय होता. सीए अभ्यासक्रमातील आर्टिकलशिप करताना आवश्यक नेतृत्वगुण, संभाषण कौशल्य आणि सादरीकरण अशा विविध पैलूंवर या या प्रशिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. याकरिता पुण्यातून सीए प्रफुल्ल कराळे, सीए राजश्री गोळे, सीए दिनेश राठी, सीए कुशल मिश्रा, सीए पवन मालू, सीए रेश्मा जाधव व सीएस अमर पाटील यांनी मार्गदर्शन केले. सीए इन्स्टिट्यूटच्या रत्नागिरी शाखेच्या माध्यमातून रत्नागिरीत हे प्रशिक्षण उपलब्ध झाल्याने विद्यार्थ्यांची ब-याच वर्षांची मागणी पूर्ण झाली.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here