पोलादपूर: गेले आठ दिवस संततधार कोसळणाऱ्या पावसामुळे कशेडी घाटात भोगाव हद्दीतील ९० फूट रस्ता सुमारे दोन फूट खोल खचला आहे. यामुळे वाहनचालक व प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र, संबंधित खात्याचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप जनतेतून व्यक्त होत आहे. सध्या एकेरी वाहतूक सुरू असून कशेडी घाटात पोलिस बंदोबस्त करण्यात आला आहे. मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी घाटात भोगाव गावच्या हद्दीत दरवर्षी रस्ता खचण्याचे ग्रहण लागले आहे. शासनाकडून दरवर्षी लाखो रुपये खर्च करून डागडूजी केली जाते. मात्र, कायम स्वरूपी उपाय योजना होत नसल्याने शासनाचे लाखो रुपये दरवर्षी पाण्यात जात असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. यंदाही शनिवारी २७ जुलै रोजी सुमारे ९० ते १०० फूट रस्ता सुमारे दोन फूट खोल खचून रस्त्याला भेगा पडल्या आहेत. दोन दिवस उलटून गेले असले तरी अद्याप राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाकडून कोणत्याही प्रकारे दखल घेण्यात आलेली नाही. त्यामुळे आज सोमवार रोजी एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली आहे. कशेडी महामार्ग पोलीस उपनिरीक्षक राजेश उसगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी या ठिकाणी फलक लावून दुर्घटना टाळण्यासाठी सुरक्षा व्यवस्था राबवली आहे. याबाबत आमच्या प्रस्तुत प्रतिनिधीने नॅशनल हायवेचे उपअभियंता श्री गायकवाड यांचेशी संपर्क साधला असता सोमवारी दुपारी खचलेला रस्ता दुरुस्तीच्या कामाला सुरुवात करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. या कामाची जबाबदारी रिलायन्स कंपनीची असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
