उपमुख्यमंत्रिपदाचा पदभार स्वीकारल्यापासून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी धडाकेबाज निर्णय घेतले आहेत. आज विकासकामांच्या आढावा बैठकीत त्यांनी असेच धडाकेबाज निर्णय घेतले आहेत. पुणे मेट्रोचं नाव बदलून ‘पुणे पिंपरी-चिंचवड महामेट्रो’ असं करण्याच्या सुचना त्यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. बैठकीत मेट्रोसंदर्भातले अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. मेट्रोच्या प्रस्तावित सहा काॅरिडोरचे काम टप्प्याटप्प्याने सुरु करण्याऐवजी सर्व काॅरिडोरचे काम एकाचवेळी सुरु करण्याचे डीपीआरचे आदेश अजित पवार यांनी दिले आहेत. पिंपरी-स्वारगेट मेट्रो मार्ग निगडी-कात्रज असा करण्यात येणार आहे. तसेच वनाज-रामवाडी असा मार्ग वाढवून चांदणी चौक ते वाघोली असा करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे. शिवाजीनगर हिंजवडी हा मार्ग शिवाजीनगर माण असा वाढवण्यात येणार आहे. हडपसर स्वारगेट हा मार्ग नव्याने प्रस्तावित आहे. तसेच निगडी चाकण मेट्रो मार्गाची चाचपणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे मेट्रोसंदर्भात अनेक मोठे निर्णय घेण्यात आले आहेत.
