फलंदाजीच्या सुधारीत कामगिरीने भारताचे ऑस्ट्रेलियाला ३४१ धावांचे आव्हान

0

राजकोट एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाने सलामीवीर रोहित शर्मा, शिखर धवन, विराट कोहली आणि मधल्या फळीत लोकेश राहुल यांनी केलेल्या धडाकेबाज फलंदाजीच्या जोरावर ३४० धावांचा पल्ला गाठला आहे. पहिल्या सामन्याच्या तुलनेत दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय फलंदाजांची कामगिरी सुधारलेली पहायला मिळाली. हा सामना जिंकण्यासाठी ऑस्ट्रेलियाला ३४१ धावांची गरज आहे. कांगारुंकडून फिरकीपटू झॅम्पा आणि रिचर्डसन या गोलंदाजांना सामन्यात यश मिळाले. पहिल्या सामन्यात अपयशी ठरलेल्या रोहित शर्मा आणि शिखर धवन जोडीने दुसऱ्या सामन्यात डावाची सुरुवात सावधपणे केली. ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचा दोन्ही फलंदाजांनी नेटाने सामना करत पहिल्या विकेटसाठी ८१ धावांची भागीदारी केली. ४२ धावांवर रोहित शर्माला बाद करत झॅम्पाने भारताची जमलेली जोडी फोडली. यानंतर शिखर धवन आणि विराट कोहली यांनी संघाचा डाव सावरत दुसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली. ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचा या दोन्ही फलंदाजांनी समाचार घेत मैदानाच्या चौफेर फटकेबाजी केली. आपल्या शतकापासून ४ धावा दूर असताना शिखर धवन रिचर्डसनच्या गोलंदाजीवर स्टार्कने त्याचा झेल घेतला. यानंतर मैदानावर आलेला श्रेयस अय्यरही फारशी चमक दाखवू शकला नाही. विराटने यानंतर लोकेश राहुलच्या साथीने पुन्हा एकदा महत्वपूर्ण भागीदारी करत संघाला आश्वासक धावसंख्येकडे नेले. यादरम्यान विराट कोहलीने आपले अर्धशतकही पूर्ण केले. आपले शतक विराट झळकावणार असे वाटत असतानाच त्याचा अडसर दूर झॅम्पाने केला. त्याने ७८ धावांची खेळी केली. यानंतर तब्बल वर्षभराच्या कालावधीनंतर सामन्यात संधी मिळालेला मनिष पांडेही झटपट माघारी परतला. दरम्यान लोकेश राहुलने अष्टपैलू रविंद्र जाडेजाला सोबत घेत आपले अर्धशतक पूर्ण केले आणि संघाला ३४० धावांचा टप्पा गाठून दिला, लोकेशने ८० धावा केल्या.

IMG-20220514-WA0009

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here