खळबळजनक : चिपळुणात परिचारिकेवर अतिप्रसंग; नराधम पसार

0

चिपळूण : चिपळूण शहर परिसरात एका परिचारिकेवर अज्ञाताने अतिप्रसंग केल्याची खळबळजनक घटना गुरुवारी रात्री 7.45 वाजण्याच्या सुमारास घडली आहे. यावेळी या तरुणीने अज्ञात नराधमाला प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता त्याने तिला मारहाण केल्याने ही तरुणी जखमी झाली आहे. या तरुणीवर खासगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत. तर या प्रकरणी अज्ञात नराधमाविरोधात येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक मोहितकुमार गर्ग यांनी घटनास्थळाची पाहणी करून अज्ञाताचा शोध घेण्याच्या दृष्टीने पोलिसांना योग्य त्या सूचना केल्या आहेत. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार ही तरुणी चिपळुणातील एका खासगी दवाखान्यात कामाला आहे. ती नेहमीप्रमाणे गुरुवारी रात्रीच्या सुमारास दवाखान्यात कामासाठी जात असताना ती भोगाळे परिसरात आली असता अज्ञात तिच्या पाठीमागून आला आणि तिला जबरदस्तीने रस्त्याच्या कडेला असलेल्या मोकळ्या जागेत घेऊन तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. या प्रकाराने ती तरुणीभेदरून गेली. तरीही तिने या अज्ञात नराधमाला प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. यामुळे या नराधमाला राग आल्याने त्याने तिला हाताच्या ठोशाने व तिथेच असणाऱ्या दगडाने मारहाण केली. यामध्ये ती तरुणी जखमी झाली. त्यानंतर या अज्ञाताने तेथून पळ काढला. भेदरलेल्या अवस्थेत या तरुणीने या प्रकाराची माहिती नातेवाईकांना व पोलिसांना दिली. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला तर दरम्यान या तरुणीला खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले.या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक मोहितकुमार गर्ग, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन बारी, पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीमती शिंदे आदींनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. तर या नराधमाचा शोध घेण्याच्या दृष्टीने ठसेज्ज्ञ व श्वानपथकाला पाचारण करण्यात आले होते. मात्र, सध्या तरी कोणताही सुगावा लागला नाही. परंतु पोलिसांनी या नराधमाचा शोध घेण्याच्या दृष्टीने योग्य ती पावले उचलली आहेत. लवकरच हा नराधम पोलिसांच्या हाती सापडेल असा कयास व्यक्त केला जात आहे. मात्र, चिपळूण शहराच्या मध्यवर्ती भागात ही घटना घडल्याने चिपळूणसह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. यामुळे महिला सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:57 AM 19-Jun-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here