मानवी वस्तीत आश्रयास आलेल्या बिबट्याचे बछडे पिंजऱ्यात जेरबंद

0

राजापूर तालुक्यातील शेजवली येथे मानवी वस्तीत आश्रयास आलेल्या बिबट्याच्या दोन बछड्यांना वनविभागाने पिंजऱ्यात जेरबंद करून त्यांना सुरक्षित नैसर्गिक अधिवासात सोडून दिले आहे. शेजवली येथील ग्रामस्थ विजय गुणाजी परवडे यांच्या घरात गुरूवारी सायंकाळी ७ वाजण्याच्या दरम्यान बिबट्याचे एक पिल्लू घरात घुसले तर एक बाहेर थांबले होते. थोड्या वेळातच ही दोन्ही पिल्ले प्रकाश महादेव मांजरे यांच्या गोठ्यात लाकडाचे माचाखाली लपून राहिले. याबाबत शेजवली उपसरपंच मंदार राणे यांनी वनविभागाला दूरध्वनीवरून खबर दिली. त्यांनतर वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी विभागीय अधिकारी रमाकांत भवर यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी वनक्षेत्रपाल प्रियांका लगड, राजापूर वनपाल एस. व्ही. घाटगे, वनरक्षक संजय रणधीर यांसह दीपक म्हादये, विजय म्हादये, दीपक चव्हाण यांनी घटनास्थळी भेट देत ग्रामस्थ मंदार राणे, राजेंद्र देवळेकर, सुरेश परवडे, रामचंद्र देवळेकर, विकास परवडे, प्रथमेश परवडे यांच्या सहकार्याने या दोन्ही बछड्यांना पिंजऱ्यात जेरबंद केले. हे दोन्ही बछडे सुमारे सात तेआठ महिन्याचे असून त्यांना सुरक्षित अधिवासात सोडून देण्यात आले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here