मुंबई: लोकसभा निवडणुकीनंतर मेगा भरती होणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली होती. अनेक क्षेत्रात मेगा भरती सुरू झाली असली, तरी प्रत्यक्ष मेगा भरती पक्षांमध्ये सुरू असल्याचे चित्र सध्या राजकीय क्षेत्रात दिसून येत आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या अनेक दिग्गज नेत्यांनी आपल्या पक्षाला रामराम ठोकत भाजप तसेच शिवसेनेत प्रवेश केला आहे तर काहीजण वाटेवर आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्र्यांना खोचक टोमणा मारला. आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधले नेते भाजप आणि सेनेत जात आहेत. सचिन अहिरे यांच्यानंतर चित्रा वाघ यांनीही राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकला. यानंतर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि भाजप नेत्यांमध्ये वाद झाला. त्यावेळी पवार यांनी सत्तेचा गैरवापर करून पक्षांतर केले जात आहे असा भाजपवर आरोप लगावला. त्यावेळी जलसंपदा मंत्री भाजप नेते गिरीष महाजन यांनी पलटवार करत आणखी ५० नेते भाजपमध्ये येण्यार असल्याचा दावा केला. यासर्व घडामोडीनंतर नवी मुंबई महापालिकेतील सत्तारूढ राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
