ऍमेझॉनने केली भारतात मोठ्या गुंतवणुकीची घोषणा…

0

ई-कॉमर्स कंपनी असलेल्या ऍमेझॉनने आज हिंदुस्थानात मोठ्या गुंतवणुकीची घोषणा केली आहे. पायाभूत सुविधा, टेक्नॉलॉजी आणि लॉजिस्टिक नेटवर्कमध्ये गुंतवणूक करणार असल्याचे ऍमेझॉनने घोषित केले. या माध्यमातून येत्या पाच वर्षांत देशभरात दहा लाख नवीन रोजगारनिर्मिती करण्याची योजना असल्याचे कंपनीने सांगितले आहे. ऍमेझॉन कंपनीने निवेदनात म्हटले आहे की, 2025 पर्यंत हिंदुस्थानात दहा लाख नव्या नोकऱ्या उपलब्ध करून देणार असल्याची योजना आहे. गेल्या सहा वर्षांत ऍमेझॉनने हिंदुस्थानात केलेल्या गुंतवणुकीतून सात लाख नोकऱ्या उपलब्ध झाल्या आहेत. त्यात आता या 10 लाख नोकऱ्यांची भर पडणार आहे. या नोकऱ्यांमध्ये प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष अशा दोन्ही प्रकारच्या रोजगारांचा समावेश आहे. यामुळे माहिती-तंत्रज्ञान, कौशल्य विकास, मनोरंजन, सामग्री उत्पादन, लॉजिस्टिक आणि उत्पादन इत्यादी सर्व क्षेत्रांत रोजगारनिर्मिती होणार आहे. 2025 पर्यंत एक कोटी लघु आणि मध्यम व्यावसायिकांना ऑनलाइन मंचावर आणून 10 अब्ज डॉलर्सची हिंदुस्थानी वस्तूंची निर्यात करण्याची घोषणा ऍमेझॉनचे प्रमुख जेफ बेझोस यांनी बुधवारी केली होती. बेजोस पुढे म्हणाले की, हिंदुस्थानात दहा लाख नव्या रोजगार निर्मितीसाठी आम्ही येत्या पाच वर्षांत गुंतवणूक करत आहोत. आमच्या कर्मचाऱ्यांकडून आम्हाला अभूतपूर्व योगदान मिळत आहे. छोट्या व्यवसायातील व्यापाऱ्यांनी आमच्यासोबत जोडण्यासाठी दाखवलेले प्राधान्य आणि ग्राहकांचा मिळणारा अभूतपूर्व पाठिंबा आम्ही पाहिला आहे. आता पुढील वाटचालीसाठी आम्ही आशावादी आहोत. रोजगारनिर्मिती आणि कौशल्य विकास उपक्रमांना हिंदुस्थानात प्राधान्य देण्यात आले आहे. यामध्ये 2022 पर्यंत शहरी आणि ग्रामीण भागातील 40 कोटींहून अधिक लोकांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. 2014 पासून ऍमेझॉनचे हिंदुस्थानातील कर्मचारी चार पटीने वाढले आहेत, याचीही माहिती निवेदनातून देण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here