राजकोट येथे भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात 3 सामन्यांच्या वनडे मालिकेतील दुसरा सामना पार पडला. हा सामना भारताने 36 धावांनी जिंकला. तसेच मालिकेत 1-1 ने बरोबरी केली. या सामन्यात ऑस्ट्रेलियाला पराभूत केल्यानंतर भारताचा कर्णधार विराट कोहलीने केएल राहुलने केलेल्या आक्रमक अर्धशतकी खेळीची प्रशंसा केली आहे. राहुलने या सामन्यात 52 चेंडूत 3 षटकार आणि 6 चौकारांच्या मदतीने 80 धावा केल्या. त्याच्या या खेळीमुळे भारतीय संघाला 340 या मोठ्या धावसंख्येपर्यंत मजल मारता आली. राहुलची प्रशंसा करताना विराट म्हणाला की, “पाचव्या क्रमांकावर संघासाठी अशी फलंदाजी करणे, राहुलची ही नक्कीच आंतरराष्ट्रीय पातळीवरील सर्वोत्कृष्ट कामगिरी होती. त्याच्या या खेळीने त्याची परिपक्वता आणि स्तर दाखवून दिला.” “तुम्हाला हे जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे की तुमच्यासाठी मैदानावर सर्वोत्कृष्ट संघ कोणता आहे. जेव्हा तुम्ही राहुलला या सामन्यात फलंदाजी करताना पाहिले असेल तर, त्याच्यासारख्या खेळाडूला संघातून बाहेर बसवणे कठीण आहे,” असे सामना जिंकल्यानंतर विराट म्हणाला.
