‘लोकमत महामॅरेथॉन’ च्या दुसऱ्या पर्वाचा थरार पुण्यात रंगणार

0

देशातील मॅरेथॉन शर्यतीची जननी असलेल्या पुण्यनगरीतील नागरिकांच्या हृदयात स्थान निर्माण केलेल्या व्हीटीपी रिअ‍ॅल्टी प्रस्तुत किंग्ज ऑटोरायडर्स आणि सीएम इंटरनॅशनल स्कूल, बालेवाडी यांच्या सहकार्याने आयोजित ‘लोकमत महामॅरेथॉन’च्या दुसऱ्या पर्वाचा थरार पुणे शहरात रंगणार आहे. येत्या १६ फेब्रुवारीला म्हाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलातून या शर्यतीला प्रारंभ होणार आहे. मागील वर्षी पुण्यात झालेल्या ‘लोकमत महामॅरेथॉन’च्या पहिल्या पर्वाला अभूतपूर्व प्रतिसाद लाभला. त्यात सर्व वयोगटांतील फिटनेसप्रेमी, व्यावसायिक तसेच हौशी धावपटू, प्रशासकीय अधिकारी-कर्मचारी, आयटीयन्स, विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले होते. आकर्षक बक्षिसे, अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर, अचूक नियोजन या वैशिष्ट्यांमुळे पहिल्या वर्षी ही शर्यत चोखंदळ अशी वैश्विक ओळख असलेल्या पुणेकरांच्या पसंतीस उतरली. यामुळे साहजिकच ‘लोकमत महामॅरेथॉन’च्या दुसऱ्या पर्वाबाबत पुण्यात सर्वत्र उत्सुकता होती. त्यांची प्रतीक्षा आता संपली आहे. शर्यतीच्या दुसऱ्या पर्वाच्या नाव नोंदणीला प्रारंभ झाला असून, प्रारंभीच पुणेकरांनी मोठ्या प्रमाणावर आपला प्रवेश निश्चित केला आहे. नावनोंदणीची अंतिम मुदत ३१ जानेवारीपर्यंत आहे. ३ किलोमीटरची फॅमिली रन आणि ५ किलोमीटर फन रन (१२ वर्षांपेक्षा जास्त, धावण्याचा छंद असणाऱ्यांसाठी) १० किलोमीटरची पॉवर रन (१६ पेक्षा जास्त वर्षांवरील) आणि २१ किलोमीटर (१८ वर्षांपुढील) अशा गटांमध्ये ही शर्यत रंगणार आहे. त्याचप्रमाणे लष्कर आणि पोलीस दलातील धावपटूंसाठी ‘डिफेन्स’ हा २१ किलोमीटर अंतराचा वेगळा गट ठेवण्यात आला आहे. विविध गटांमधील विजेत्यांना एकूण सहा लाख रुपयांपर्यंत बक्षिसे दिली जाणार आहेत. ३ आणि ५ किलोमीटर अंतराच्या गटामध्ये नावनोंदणी करणाऱ्यांना टी-शर्ट, गुडी बॅग, सहभागाचे पदक आणि ब्रेकफास्ट देण्यात येईल. १० तसेच २१ किलोमीटर गटात नोंदणी करणाऱ्या सर्व धावपटूंना टी शर्ट, गुडी बॅग, सर्टिफिकेट, ब्रेकफास्ट यांसह टायमिंग चिप उपलब्ध करून देण्यात येईल. या गटातील शर्यत पूर्ण करणाऱ्यांना मेडल देण्यात येईल. १० तसेच २१ किलोमीटर शर्यतीच्या पुरुष आणि महिला गटातील तसेच डिफेन्स गटातील पहिल्या ३ क्रमांकाच्या विजेत्यांना आकर्षक बक्षिसे देण्यात येतील. धावणे हा आदर्श व्यायामप्रकार आहे. त्यामुळे लघू, मध्यम वा लांब पल्ल्याच्या धावण्याच्या शर्यतीत सहभागी होण्याचा अनुभव आरोग्यदायी, आनंददायक असतो. गेल्या काही वर्षांपासून पुणेकर आरोग्याबाबत कमालीचे जागरूक झाले आहेत. पहाटे, सायंकाळी वेळ मिळेल तेव्हा पुणेकर तंदुरुस्ती कायम राखण्यासाठी घाम गाळताना दिसतात. यापैकी बहुतेक जण धावणे या व्यायाम प्रकाराला प्राधान्य देताना दिसतात. पुण्यात सर्वत्र मोठ्या प्रमाणावर रनर्स ग्रुप तयार झाले असून, ते इतरांनाही धावण्यासाठी प्रोत्साहित करीत आहेत. या रनर्स ग्रुपनी मागील वर्षीच्या शर्यतीला भरभरून प्रतिसाद दिला होता. या शर्यतीच्या दुसऱ्या पर्वात स्वत: धावण्यास आणि अनेक पुणेकरांना प्रोत्साहन देण्यात ते उत्सुक आहेत. ‘लोकमत महामॅरेथॉन’च्या निमित्ताने अनेकांनी मागील वर्षी धावण्याच्या मोहिमेचा श्रीगणेशा केला. तेदेखील फिटनेसच्या या महोत्सवात सहभागी होणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here