पंतप्रधान किसान भातपीक स्पर्धेचे आयोजन : बाळ माने

0

रत्नागिरी : तालुक्यात भातपिकाचे क्षेत्र वाढण्याकरिता रत्नागिरी तालुका खरेदी-विक्री संघाने पंतप्रधान किसान भातपीक स्पर्धेचे आयोजन केले आहे. अशा प्रकारे प्रथमच स्पर्धा आयोजित करून शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याचा उपक्रम राबवत असल्याची माहिती संघाचे अध्यक्ष माजी आमदार बाळासाहेब माने यांनी दिली. ग्रामपंचायत आणि शेतकरी ग्रुप अशा दोन गटांत स्पर्धा होणार आहे. विजेत्यांना आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहेत. मदत करणाऱ्या व्यक्तींनाही भेटवस्तू देण्याचा निर्णय तालुका खरेदी-विक्री संघाने घेतला आहे. अशा प्रकारे पंतप्रधान किसान भातपीक स्पर्धा आयोजित करून शेतकऱ्यांना प्रोत्साहन देऊन उत्पन्न दुप्पट करण्याचा प्रयत्न करत असल्याचे श्री. माने यांनी सांगितले. चालू खरीप हंगामाकरिता ही स्पर्धा आहे. केंद्र सरकारने चालू खरीप हंगामात भातपिकाला प्रतिक्विंटल १९४० रुपये हमीभाव जाहीर केला आहे. तसेच यंदा राज्य सरकारने ७०० रुपये बोनस जाहीर केला होता. त्यामुळे शेतकर्यांला प्रतिक्विंटल किमान २६४० रुपये मिळतील. शासनाच्या वतीने हे भात रत्नागिरी खरेदी-विक्री संघ खरेदी करणार आहे. त्याचे पैसे लगेचच शेतकर्यातला डीबीटी पद्धतीने बॅंक खात्यात जमा केले जाणार आहेत. ग्रामपंचायत स्तरावरील स्पर्धेसाठी किमान एक एकर क्षेत्रावर एका शेतकर्या ची किंवा शेतकरी गटाची किंवा बचत गटाची भात लागवड आवश्यक आहे. ग्रामपंचायत हद्दीमधील किमान ३० शेतकरी, शेतकरी गट किंवा बचत गट या स्पर्धेमध्ये सहभागी व्हायला हवेत. असे एकत्रित मिळून एका ग्रामपंचायत हद्दीमध्ये किमान ३० एकर क्षेत्रावर सहभागी स्पर्धाकांद्वारे भात लागवड केलेली हवी. लागवड केलेल्या भातापैकी ग्रामपंचायत हद्दीमधील किमान ५०० क्विंटल भात विक्रीकरिता खरेदी-विक्री संघामार्फत शासनाला दिले पाहिजे. हे भात संघामार्फत ग्रामपंचायत परिसरात येऊन खरेदी केले जाईल. या सर्व अटी पूर्ण करणारे ग्रामपंचायती स्पर्धेस पात्र असतील. सर्वांत जास्त भात विक्रीसाठी देणाऱ्या तालुक्यातील प्रथम ४ ग्रामपंचायतींना आकर्षक बक्षिसे दिली जातील, अशी माहिती बाळ माने यांनी दिली. पॉवरटिलर, मिनी पॉवरटिलर, ग्रासकटर, पाठीवरील नॅप सॅक स्प्रेअर असे बक्षिसांचे स्वरूप असेल. स्पर्धेमध्ये मदत करणारे तलाठी, ग्रामसेवक, कृषी पर्यवेक्षक, कृषी सहाय्यक, कोतवाल, विविध कार्यकारी संस्थांचे गट सचिव यांना आकर्षक भेटवस्तू दिली जाईल, असेही ते म्हणाले. शेतकरी ग्रुप पातळीवर शेतकऱ्यांनी गेल्या वर्षीपेक्षा जास्त क्षेत्रावर भात पिकवणे आवश्यक आहे. कमीत कमी एक एकर क्षेत्रावर एका शेतकऱ्याची किंवा शेतकरी गटाची किंवा बचत गटाची भात लागवड होणे आवश्यक आहे. सर्वांत जास्त भात रत्नागिरी तालुका सहकारी खरेदी-विक्री संघामध्ये देणाऱ्या शेतकऱ्यांना आकर्षक बक्षिसे दिली जातील. सर्वांत जास्त भात विक्रीसाठी देणाऱ्या ग्रामपंचायत पातळीवर पात्र असलेल्या प्रत्येक ग्रामपंचायत हद्दीमधील पहिल्या ४ शेतकरी स्पर्धकांना बक्षिसे दिली जातील. एक सुफला बॅग आणि दोन युरिया बॅग किंवा एक लिटर नॅनो युरिया आणि 2 वैभव विळे, युरिया बॅग किंवा ए लि. नॅनो युरिया आणि दोन वैभव विळे, 2 युरिया बॅग किंवा एक लि. नॅनो युरिया आणि ए वैभव विळा, एक युरिया बॅग किंवा ५०० मिलि नॅनो युरिया अशी बक्षिसे दिली जातील. ज्या ग्रामपंचायती या स्पर्धेस पात्र असतील अशा सर्व ग्रामपंचायत हद्दीमधील शेतकरी स्पर्धकांना सहभागासाठी प्रोत्साहन म्हणून 200 रुपयांचा बोनस शेअरच्या रूपाने देण्यात येणार आहे. म्हणजेच रत्नागिरी तालुका सहकारी खरेदी विक्री संघामार्फत सहभागाबद्दल १०० रुपये प्रवेश शुल्क आणि १०० रुपयांचा एक शेअर भरून सभासद केले जाणार असल्याचे बाळ माने यांनी सांगितले. नावनोंदणीसाठी १५ जुलै ही अंतिम तारीख आहे. अधिक माहितीसाठी रत्नागिरी तालुका खरेदी-विक्री संघ, प्रधान कार्यालय, अरिहंत स्पेस सेंटर, तिसरा मजला, गाळा नं. ९, मारुती मंदिर, ता. जि. रत्नागिरी – ४१५६१२ (फोन नं. ०२३५२-३५६०३३, राजभूषण परब (8830825195), सिद्धेश आलीम (9049133734) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. प्रवेशासाठी गुगल फॉर्मवर नोंदणी आवश्यक असून त्यासाठी https://docs.google.com/forms/d/1ZAnc9VBsJHfxCnWCcxgs4YbxJnzru8y2jbWYbH2REWk/edit ही लिंक देण्यात आली आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
6:08 PM 21-Jun-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here