राज्यातील पहिल्या बाल कोविड सेंटरचे रत्नागिरीत उद्घाटन

0

रत्नागिरी : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा मुकाबला करतानाच रत्नागिरी जिल्हा प्रशासनाने तिसऱ्या लाटेची शक्यता गृहीत धरून पूर्वतयारी केली, याबद्दल पालकमंत्री या नात्याने मला अत्यंत समाधान आहे. या स्वरूपाचे हे राज्यातील पहिलेच केंद्र ठरेल, असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल परब यांनी केले. श्री. परब यांच्या हस्ते बाल कोव्हिड केंद्रासह महिला रुग्णालयातील ऑक्सिजन निर्मिती संच आणि स्वस्तिक समर्पित बाल कोव्हिड रुग्णालयाचे लोकार्पण सोमवारी दूरदृश्य प्रणालीद्वारे झाले. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला दोन्ही माध्यमातून मान्यवर उपस्थित होते. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव, आमदार अनिकेत तटकरे, आमदार राजन साळवी, आमदार योगेश कदम, जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांचा त्यात समावेश होता. रत्नागिरीत मारुती मंदिर परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलात १०० बेड्सची व्यवस्था असणारे बाल कोव्हिड केंद्र तयार करण्यात आले आहे. अत्यंत अभिनव स्वरूपात तयार करण्यात आलेल्या या केंद्रात लहान मुलांना खेळण्याची साधने, चित्र, पौष्टिक खाऊ आणि व्हिडीओ बघण्याची व्यवस्था आहे. यासोबत महिला रुग्णालयात ऑक्सिजन निर्मिती संयत्र उभारणी करण्यात आली आहे. त्याची क्षमता प्रतिदिन १७० जम्बो सिलिंडरची आहे. रुग्णालयात १४ खाटांच्या बालरुग्ण अतिदक्षता कक्षाचीही उभारणी करण्यात आली आहे. याचेही लोकार्पण यावेळी झाले. रत्नागिरीतील स्वस्तिक रुग्णालयाचे रूपांतर समर्पित बाल कोव्हिड रुग्णालयात करण्यात आले आहे. तेथे ५ खाटांना व्हेंटिलेटर सुविधा राहणार आहे. सोबतच ४० खाटा ऑक्सिजन सुविधेसह आहेत. त्याचेही लोकार्पण यावेळी पालकमंत्री ॲड. परब यांनी केले. तिसऱ्या लाटेपूर्वी दूरदृष्टी ठेवून जिल्हा स्वयंसिद्ध असावा, असे प्रयत्न जिल्हा प्रशासनाने केले आहेत. यात वेगवेगळ्या माध्यमातून विलगीकरण व्यवस्था, ऑक्सिजन सुविधा आदींचा समावेश आहे. याबाबत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी माहिती दिली आणि जिल्हा प्रशासनाच्या कामाचे कौतुक केले.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2YNJN6A
10:07 AM 22-Jun-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here