मित्रांच्या त्रासाला कंटाळून बारावीतल्या विद्यार्थ्याची अभ्यासिकेतच आत्महत्या

0

चंद्रपूर शहरातील सेवादल छात्रावासात बारावीमध्ये शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने अभ्यासिकेत गळफास लावून आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. जिल्ह्यातील दुर्गम ‘पाटण’ येथील रहिवासी असलेल्या या विद्यार्थ्याने सहकारी मित्रांच्या सततच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचे नातेवाईकांनी म्हटले आहे. पोलिसांनी तपास सुरू केला आहे. चंद्रपूर जिल्ह्यात गरीब गरजू व होतकरू विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे हक्काचे स्थान म्हणून शहरातील सेवादल छात्रावासाची ख्याती आहे. या सेवादल छात्रावासात बाराव्या वर्गात शिकणाऱ्या सिद्धार्थ काळे या विद्यार्थ्याने छात्रावासातील अभ्यासिकेत गळफास लावून घेत आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे. छात्रावासातील सीसीटीव्ही यंत्रणेनुसार पहाटे पावणेतीन वाजता तो आपल्या खोलीतून निघून अभ्यासिकेकडे गेला आहे. इलेक्ट्रिक तारांचा फास बनवून त्याने पहाटे गळफास लावून घेतला. दरम्यान शनिवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. छात्रावासाचे कर्मचारी व विद्यार्थी एकत्र आल्यानंतर सिद्धार्थला त्याच्या सहकारी मित्रांकडून सततचा त्रास सहन करावा लागत होता हे उघड झाले. या ठिकाणी सातव्या वर्गात शिकत असलेल्या त्याच्या भावाने ही गोष्ट नमूद केली असून त्याच्या खोलीच्या भिंतींवर ‘सिद्धार्थ नपुंसक आहे’ असे लिहिले आहे. छात्रावासाच्या अधीक्षक व कर्मचाऱ्यांनी मात्र आपल्याला त्याच्या त्रासाविषयी कुठलीही कल्पना नाही असे म्हटले आहे. दरम्यान जिल्ह्यातील जिवती या अतिदुर्गम तालुक्यातील पाटण या गावातील रहिवासी असलेल्या त्याच्या आई-वडिलांना छात्रावासात बोलावण्यात आले असून या प्रकरणात दोषींवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. दरम्यान पोलिसांनी छात्रावासात पोहोचत सिद्धार्थचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात रवाना केला असून त्याच्या आत्महत्येशी संबंधित विविध गोष्टी तपासल्या जात आहेत. सिद्धार्थच्या खोलीची तपासणी देखील करण्यात येत असून भिंतीवरील संदेशाचा नेमका अर्थ काय हेही उलगडून पाहिले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here