नरवीर तान्हाजी मालुसरे यांच्या 350 व्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या समाधी स्थळाच्या सुशोभीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू

0

पोलादपूर तालुक्यातील उमरठ गावचे सुपुत्र नरवीर तान्हाजी मालुसरे यांची 350 वी पुण्यतिथी 17 फेब्रुवारी रोजी होत आहे. त्यानिमित्ताने नरवीर तान्हाजी मालुसरे यांच्या समाधी स्थळाच्या सुशोभीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू असून भविष्यात याठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज आणि नरवीर तान्हाजी मालुसरे यांच्या पराक्रमाची गाथा भित्तिचित्रातून साकारण्याचा मानस आहे. 17 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या नरवीर तान्हाजी मालुसरे यांच्या 350 व्या पुण्यतिथीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आणण्याचा मानस असल्याचे नरवीर तान्हाजी मालुसरे उत्सव समितीचे रामदास कळंबे यांनी सांगितले. उमरठ गाव हे नरवीर तान्हाजी मालुसरे यांचे जन्मस्थळ आणि समाधीस्थळ आहे. त्यामुळे उमरठ गावाला ऐतिहासिक वारसा असून मोठ्या संख्येने पर्यटक गावाला भेट देत आहेत. नरवीर तान्हाजी मालुसरे हे कोंढाणा किल्ला सर केल्यानंतर युद्धात धारातीर्थी पडले. तान्हाजी मालुसरे यांचा मृतदेह कोंढाणा किल्ल्यावरून मडेघाट मार्गे पालखीने उमरठ येथे आणण्यात आला. त्यानंतर उमरठ येथे त्यांची समाधी बांधण्यात आली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हस्ते या समाधीचे बांधकाम करण्यात आले. नरवीर तान्हाजी मालुसरे यांच्या समाधी शेजारी शेलार मामा यांचीही समाधी आहे. या समाधीस्थळाच्या सुशोभीकरणाचे काम जोरात सुरू आहे. नरवीर तान्हाजी मालुसरे धारातीर्थी पडलेल्या सिंहगडावरून उमरठ येथे ज्या मार्गाने त्यांचा मृतदेह आणला त्याच मार्गाने पुण्यतिथी निमित्त पालखी आणणार असल्याचे कळंब यांनी सांगितले.पर्यटन विकास, जिल्हा परिषद आणि सदस्य चंद्रकांत कळंबे यांच्या निधीतून 50 लाखाचे सुशोभीकरण काम सुरू करण्यात आलेले आहे. समाधी साठी कोल्हापूर येथून दगड आणून कोल्हापूरचे कारागीर कामासाठी आणले आहेत. 17 फेब्रुवारी रोजी नरवीर तान्हाजी मालुसरे यांची 350 वी पुण्यतिथी साजरी होत असून त्याआधी काम पूर्ण होणार आहे. तसेच समाधी परिसरात केल्यासारखी तटबंदी करून छत्रपती शिवाजी महाराज आणि नरवीर तान्हाजी मालुसरे यांचा इतिहास साकार करण्यात येणार आहे. यामध्ये भित्तिचित्र, शिवसृष्टी, साकारण्यात येणार आहे, अशी माहिती रामदास कळंबे यांनी दिली. छत्रपती शिवाजी महाराज आणि नरवीर तान्हाजी मालुसरे यांचा इतिहास पुढच्या पिढीला ज्ञात व्हावा तसेच उमरठमध्ये पर्यटन वाढावे हा उद्देश यामागचा असल्याचेही कळंबे यांनी सांगितले. तान्हाजी मालुसरे यांच्या 350व्या पुण्यतिथीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आणण्याचा ग्रामस्थांचा मानस असल्याचेही कळंबे यांनी सांगितले. तान्हाजी – द अनसंग वॉरियर’ सिनेमाचे दिगदर्शक ओम राऊत यांना नरवीर तान्हाजी पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असून चित्रपटातील अजय देवगण, काजोल, देवदत्त नागे, शरद केळकर आणि इतर कलाकार पुण्यतिथी सोहळ्याला उपस्थित राहणार असल्याचे कळंबे यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here