संगमेश्वर – कसबा नदीपात्रात सापडला मृत बिबट्या

0

संगमेश्वर नजिकच्या कसबा येथील नदी पात्रात बिबट्या मृतावस्थेत सापडल्याने खळबळ उडाली आहे. वनविभागाने पाहणी केल्यानंतर या बिबट्याचा मृत्यू फासकित अडकून झाल्याचे स्पष्ट झाले आहे. फासकीत अडकलेला बिबट्या मूळ जागी सापडू नये, यासाठी त्याला कसबा काळभैरव मंदिराच्या समोरील अलकनंदा नदीत आणून टाकण्यात आल्याचे प्रथमदर्शनी सिद्ध झाले आहे. याबद्दल घटनास्थळ आणि वनविभाग यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, कसबा काळभैरव मंदिराच्या समोरून वाहणाऱ्या अलकनंदा नदीवर आज सकाळी कपडे धुण्यासाठी गेलेल्या काही महिलांना हा बिबट्या दिसला. त्यांनी याची खबर ग्रामस्थांना दिली. सर्वांनी बिबट्या पाहिला. मात्र, तो नदीतील एका दगडावर डोक ठेवून असल्याने पुढे जायची कुणी हिम्मत केली नाही. अखेर अनेक प्रयत्न करून बिबट्या हलत नसल्याने ग्रामस्थांनी जवळ जाऊन पाहणी केली असता त्याच्या पोटाखालील भागावर तार दिसून आली तसेच पोट फाटून आतील आतडे बाहेर दिसल्याने हा बिबट्या मृत असल्याचे निश्चित करून ग्रामस्थांनी वनविभागाला पाचारण केले. घटनेची माहिती मिळताच वनपाल सुरेश उपरे, वनरक्षक गावडे, गुरव आदीनी घटनास्थळी भेट दिली. पशुवैद्यकीय अधिकारी जंगम व ढाकणे यांनी त्याचे शवविच्छेदन केल्यावर फासकीत अडकून पोट फाटल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. हा बिबट्या अडीच ते तीन वर्षांचा पूर्ण वाढ झालेला नर जातीचा होता, असे सांगण्यात आले. जिथे फासकी लावली होती तिथे डुक्कर अडकेल या खात्रीत असलेल्या ग्रामस्थांना बिबट्या सापडल्याने हे प्रकरण अंगलटी येऊ नये यासाठी त्याला उचलून या नदी पात्रात आणून टाकल्याची चर्चा आहे.

HTML tutorial

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here