विद्यार्थ्यांना येणारा परीक्षेचा ताण हलका करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘परीक्षा पे चर्चा 2020’ या संवादात्मक कार्यक्रमाअंतर्गत देश-विदेशातल्या विद्यार्थी आणि शिक्षकांशी 20 जानेवारी 2020 रोजी नवी दिल्लीतल्या तालकटोरा स्टेडियमवर सकाळी अकरा वाजता संवाद साधणार आहेत. परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातल्या 104 विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. त्यांच्यासमवेत 13 शिक्षक असून 18 जानेवारीला हा चमू दिल्लीत दाखल होईल. ‘परीक्षा पे चर्चा 2020’ या कार्यक्रमामध्ये देशभरातले सुमारे 2,000 विद्यार्थी सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमाचे दूरदर्शनच्या (डी.डी. नॅशनल, डी.डी न्यूज, डी.डी इंडिया) आणि आकाशवाणीच्या (ऑल इंडिया रेडिओ मिडीयम वेव, ऑल इंडिया रेडिओ एफएम) वाहिनीवरुन थेट प्रसारण होणार आहे.या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी तणावरहित वातावरणात परीक्षा द्यावी यासाठीचा उपयुक्त आणि मोलाचा सल्ला पंतप्रधानांकडून ऐकण्यासाठी विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांमध्येही मोठी उत्सुकता आहे.
