ग्रंथालय मान्यतेवरील बंदी उठवणार – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत

0

सरकारने 2012 मध्ये ग्रंथालयांना मान्यता देण्यात येऊ नये, असा निर्णय घेतला होता. तो निर्णय बदलून आता मान्यता देणे सुरू करण्यात येईल अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. मालगुंड येथे कवी केशवसुत स्मारक सभागृहात आयोजित अखिल भारतीय मराठी विज्ञान संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघाचे खासदार विनायक राऊत यावेळी उपस्थित होते. या संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर हेमचंद्र प्रधान, स्वागताध्यक्ष मधू मंगेश कर्णिक, कोकण मराठी साहित्य परिषदेचे अध्यक्ष ज्येष्ठराज जोशी, रत्नागिरीचे नगराध्यक्ष प्रदीप साळवी आदी यावेळी उपस्थित होते. 2012 च्या एका निर्णयाद्वारे नव्या ग्रंथालयांना मान्यता देणे बंद करण्यात आले होते. केशवसुत स्मारकात होणाऱ्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने नव्या ग्रंथालयांना मान्यता देण्याचे काम सुरू करण्यात येईल, अशी घोषणा उदय सामंत यांनी यावेळी केली. कोकण हे बुद्धिवंतांची भूमी आहे. या भूमीचे प्रतिनिधीत्व करण्याची संधी मला मिळाली, हे मी माझे भाग्य समजतो, असे खासदार विनायक राऊत यांनी सांगितले. तीन दिवस चालणाऱ्या या संमेलनात विविध चर्चासत्रे आणि व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारच्या सत्रात उच्च शिक्षणातील संधी या विषयावर अध्यक्ष डॉक्टर हेमचंद्र प्रधान यांच्या अध्यक्षतेखाली चर्चासत्र होणार आहे. सायंकालीन सत्रात प्राध्यापक रेखा सिंघल यांचे काजू, आंबा, फणस यांची उपयोगिता या विषयावर व्याख्यान होईल. त्यानंतर मधु मंगेश कर्णिक यांच्या अध्यक्षतेखाली कविता वाचन होणार आहे. रविवारी उद्योगधंदे व भविष्यातील संधी या विषयावर चर्चासत्र होईल. संमेलनाच्या अखेरच्या दिवशी जयगड बंदर व कातळशिल्पे यांना भेट व अभ्यास आयोजित करण्यात आला आहे.

HTML tutorial

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here