नवी दिल्ली : भारतातील वन्यजीवांच्या संरक्षणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक ठोस पाऊले उचलेली आहेत. भारतातील जैवविविधता अबाधित राहण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. त्यासाठी मोदींनी आपले कामाचे ठिकाण अर्थात साऊथ ब्लॉक ही सचिवालय इमारत सोडून थेट जीम कॉर्बेट अभयारण्य गाठले. डिस्कव्हरी वाहिनीवरील प्रसिद्ध ‘मॅन व्हर्सेस वाइल्ड’ या कार्यक्रमात मोदी हे साहसवीर बेअर ग्रिल्स सोबत दिसणार आहेत. आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिनाचे औचित्य साधून शो चा स्टार बेयर ग्रिल्स याने आपल्या ट्विटर अकाउंटवरून याची माहिती दिली आहे. ‘जिम कॉर्बेट’ नॅशलन पार्क अभयारण्य हे उत्तराखंडमध्ये आहे. येथील नैसर्गिक वैभव जगजाहीर आहे. आता डिस्कव्हरी वाहिनीवरील ‘मॅन व्हर्सेस वाइल्ड’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून या जंगलातील सौंदर्य आणि वैभव जगाला दाखवण्याची संधी मिळाली. या जंगलात अमर्याद ऊर्जा असलेल्या बेअर ग्रिल सारख्या व्यक्तीसोबत वेळ घालविण्यास मिळाला ही बाब आनंद देणारी होती, अशी भावना पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केली आहे. पंतप्रधान मोदींचा हा कार्यक्रम १२ ऑगस्ट रोजी रात्री ९ वाजता डिस्कव्हरी, डिस्कव्हरी एचडी वर्ल्ड, अॅनिमल प्लॅनेट, अॅनिमल प्लॅनेट एचडी वर्ल्ड, टीएलसी, टीएलसी एचडी वर्ल्ड, जीत प्राइम, जीत प्राइम एचडी, डिस्कव्हरी सायन्स, डिस्कव्हरी टर्बो, डिस्कव्हरी किड्स आणि डिस्कव्हरी एचडी वर्ल्ड अशा विविध १२ वाहिन्यांवर प्रसारित होणार आहे. प्रेक्षकांना हा कार्यक्रम इंग्रजी, बंगाली, हिंदी, तामिळ आणि तेलुगू भाषेत पाहता येणार आहे.
