पावसाळ्यापूर्वी बंधारा संरक्षित करणार – उदय सामंत यांचे निर्देश

0

रत्नागिरीतील पंधरामाड आणि त्यालगतच्या गावात येणाऱ्या पावसाळ्यात समुद्राचे पाणी शिरू नये, यासाठी तातडीने काम सुरू करण्यात यावे, असे निर्देश राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिले. ग्रामस्थांशी झालेल्या संवाद बैठकीत पावसाळ्यापूर्वी हा बंधारा संरक्षित केला जाईल, असे त्यांनी ग्रामस्थांना सांगितले. यावेळी श्री. सामंत यांनी ग्रामस्थांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. समुद्राचे पाणी आत शिरू नये, यासाठी बंधारा संरक्षित करण्यासाठी टेट्रापॉडचा वापर करण्यात येणार आहे. याकरिता दोन कोटी २० लाख रुपयांचा निधी देण्यात आला असून इतर कामांसाठी एक कोटी ३४ लाख रुपये निधी यापूर्वीच देण्यात आला आहे. येथे आवश्यक असलेले ६० लाख रुपये नियोजन निधीतून देण्यात यावे, असे सामंत यांनी यावेळी सांगितले. बंधारा संरक्षित करण्यासाठी आणि त्याचे सुशोभीकरण करून या ठिकाणी पर्यटन संधी उपलब्ध करून देण्याचे यावेळी ठरविण्यात आले. सुशोभिकरण आणि पूर्ण बंधाऱ्याच्या साडेतीन किलोमीटर लांबीच्या बांधकामासाठी १८९ कोटीची निविदा काढली जाणार आहे. पावसाळ्यापूर्वी तातडीचे काम म्हणून दोन कोटी वीस लाखांच्या कामाची निविदा यापूर्वीच निघालेली आहे. अल्प मुदत निविदा काढून पावसाळ्यापूर्वी सर्व कामे पूर्ण करण्याचे निर्देश सामंत यांनी दिले. ग्रामस्थांनी या कामासाठी सहकार्य करावे, प्रशासन आपली बाजू व्यवस्थित पार पाडेल. दोघांच्या समन्वयातून किनाऱ्यावरील गावांचे संरक्षण केले जाईल, असेही ते यावेळी म्हणाले. बैठकीस जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, पत्तन विभागाच्या रूपा गिरासे, पतन अभियंता बी. ए. शिंदे, सहाय्यक पतन अभियंता ए. ए. हुनेरकर, जिल्हा नियोजन अधिकारी सुभाष जुंजारे, सुमित भाटकर, दीपक पाटील, विठ्ठल मयेकर, बाळकृष्ण शिवलकर आणि इतर संबंधित विभागाचे अधिकारी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

HTML tutorial

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here