नैसर्गिक संकटात हानी होऊ नये यासाठी प्रयत्न हवेत : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

0

सिंधुदुर्ग : नैसर्गिक संकटात हानी होऊच नये, यासाठी प्रयत्न व्हायला हवेत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. वेंगुर्ले येथील रुग्णालयाचे श्रेणीवर्धन करून उभारण्यात आलेल्या ५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या नूतन इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ऑनलाइन उद्घाटन शुक्रवारी झाले. त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, नैसर्गिक संकटाचे विपरीत परिणाम रोखण्यासाठी किनारपट्टीवरील जिल्ह्यांनी आवश्यक उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. कोविडकाळात उभारलेल्या तात्पुरत्या आणि इतर रुग्णालयातील वीजपुरवठा सुरळित राखणे, ऑक्सिजन टँकची सुरक्षितता तपासणे, ऑक्सिजनचा पुरेसा साठा करून ठेवून पुराचे पाणी रुग्णालयात शिरू न देणे यादृष्टीने विशेष काळजी घ्यावी. या उपजिल्हा रुग्णालयाचे भूमिपूजन झाले, तेव्हा राज्यात कोविड विषाणूचा प्रादुर्भाव नव्हता. परंतु आजच्या परिस्थितीत या रुग्णालयाच्या पूर्णत्वाचे महत्त्व विशेषत्वाने जाणवते. गेल्या वर्षीपासून आपल्यासमोर नैसर्गिक संकटांचे एक नवीन आव्हान उभे राहिले आहे. अतिवृष्टी आणि वादळाला राज्य सामोरे गेले. या नैसर्गिक संकटात प्राणहानी होऊच नये आणि मालमत्तेची ही हानी टाळता यावी यासाठी प्रयत्न करणे अगत्याचे झाले आहे. किनारपट्टीवरील जिल्ह्यांत हजारो लोकांना कोविड नियमांचे पालन करत सुरक्षितस्थळी हलवण्यात आले. ही सगळी परिस्थिती सिंधुदुर्गसह किनारपट्टी जिल्ह्यांनी यशस्वीरीत्या हाताळली आणि या आव्हानांचा कुशलतेने सामाना केला. गेल्या दीड वर्षापासून आरोग्य यंत्रणेवर जसा ताण आहे, तसाच तो यंत्रांवरही आहे, ही यंत्रे ही चोवीस तास सुरू आहेत. त्यामुळे काही ठिकाणी दुर्दैवी घटनाही घडल्या, त्या टाळण्यासाठी विद्युत वायरिंग तपासून घेणे, रुग्णालयांचे फायर ऑडिट करणे गरजेचे आहे. या काळात मोठ्या प्रमाणात झाडे उन्मळून पडतात. ती वीज तारांवर पडून वीजपुरवठा खंडित होणार नाही याची काळजी घेणे गरजेचे असल्याचेही ते म्हणाले. नागरिकांनी कोविड प्रतिबंधक उपाययोजनांचे म्हणजे, मास्क व्यवस्थित लावणे, शारीरिक अंतर राखणे आणि हात धुणे या त्रिसूत्रीचे, कटाक्षाने पालन करावे, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या आरोग्य सुविधांमध्ये वाढ होत असल्याचा आनंद आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी यावेळी व्यक्त केला. आरोग्य हा विषय मुख्यमंत्र्यांच्या हृदयाच्या जवळचा विषय असल्याने अनेक गोष्टी त्यांच्या नेतृत्वात मार्गी लागत आहेत. अनेक चांगल्या कामांना गती मिळत असल्याचे श्री. टोपे म्हणाले. उपजिल्हा रुग्णालय सुरू होताना जिल्ह्यातील तज्ज्ञांची संख्या वाढल्याचे त्यांनी सांगितले. या रुग्णालयाला आवश्यक असलेल्या सगळ्या बाबींसाठी सहकार्य करू, रिक्त पदे भरण्याचा प्रयत्न करू. अशी ग्वाहीही श्री. टोपे यांनी यावेळी दिली. शंभर खाटाच्या निर्मितीच्या अनुषंगाने सकारात्मक निर्णय घेण्याचा आपला प्रयत्न राहील. पूर्वी चक्राकार पद्धतीने ८० टक्के नियुक्त्या विदर्भात व्हायच्या. आता हा निर्णय बदलण्याचा निर्णय घेतल्याने त्याचा कोकणवासीयांना लाभ होईल, असे सांगून त्यांनी नैसर्गिकदृष्ट्या सुंदर कोकणाला मदत करण्याची आपली सर्वांची जबाबदारी असल्याचेही स्पष्ट केले. पालकमंत्री उदय सामंत म्हणाले, माझे मूळ गाव वेंगुर्ले आहे. वेंगुर्ल्याच्या आरोग्य क्षेत्रात क्रांती करणारा आजचा दिवस आहे. त्यामुळे मला विशेष आनंद झाला आहे. कोविडच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात ऑक्सिजनसह इतर आरोग्य सुविधा मोठ्या प्रमाणात उभ्या करण्यात येत आहेत. वेंगुर्ले येथील ब्रिटिशकालीन सेंट लुक्स रुग्णालय शासनाने ताब्यात घेऊन पुन्हा सुरू करावे, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. वेंगुर्ले ग्रामीण रुग्णालयाच्या जुन्या इमारतीमधील डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरचे पालकमंत्री श्री. सामंत यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. अपुऱ्या कर्मचारीबळावर कोणतेही कारण न देता जिल्ह्याचे आरोग्य सुदृढ राहावे यासाठी आरोग्य कर्मचारी दिवसरात्र काम करत असल्याचे सांगताना जिल्ह्याला आणखी तज्ज्ञ डॉक्टर मिळावेत, अशी मागणी खासदार राऊत यांनी केली. तसेच नवीन शासकीय महाविद्यालय यावर्षी सुरू व्हावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील उर्वरित तीन रुग्णालयांचे काम वेगाने पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी यासंदर्भात तातडीने बैठक घेऊन काम मार्गी लावावे, अशी मागणी आमदार दीपक केसरकर यांनी केली. माकडताप आणि लेप्टोस्पायरोसीसची जिल्ह्यात मोठी लागण होते. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी विषाणु चाचणी प्रयोगशाळा आता सुरू झाली आहे, अशी माहिती त्यांनी दिली. कोकणचे तीन भागात विभाजन व्हावे आणि कोकणाच्या तिसऱ्या विभागात सिंधुदुर्ग-रत्नागिरीचा समावेश करावा, जेणेकरून रुग्णालयासाठी आवश्यक असलेले मनुष्यबळ उपलब्ध होऊ शकेल, अशी विनंतीही श्री. केसरकर यांनी यावेळी केली.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:26 PM 26-Jun-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here