देशातील आंबा निर्यातीमध्ये वृद्धी व्हावी, याकरीता आवश्यक सोयी सुविधा व एकात्मीक प्रयत्न होणे गरजेचे असल्याने महाराष्ट्र राज्य कृषी मंडळाने अपेडा, मुंबई व कृषी विभाग, महाराष्ट्र शासन यांचे सहकार्याने शुक्रवार २४ जानेवारी रोजी प्रादेशिक फळ संशोधन केंद्र, वेंगुला जि. सिंधुदुर्ग येथे ‘निर्यातक्षम आंबा उत्पादन व निर्यात’ या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन केले आहे. महाराष्ट्रातील कोकण विभागातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, पालघर, ठाणे या जिल्हयांतील जमीन व हवामान हापूस आंब्यासाठी उपयुक्त आहे. कोकणातील हापूस आंब्याला नुकतेच जिओग्राफीकल इंडीकेशन म्हणजेच भौगोलिक सांकेतांक प्राप्त झाला आहे. त्यामुळे कोकणात उत्पादित झालेला हापूस आंब्याला जागतिक बाजारपेठेत तसेच स्थानिक बाजारपेठेत चांगला दर प्राप्त होवू शकेल. कार्यशाळेत उपस्थितांना तांत्रिक मार्गदर्शन करण्यासाठी अपेडा, नवी दिल्ली, एनपीपीओ इ. केंद्रीय संस्थांचे वरीष्ठ अधिकारी डॉ.बाळासाहेब सावंत कोंकण कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ तसेच महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत. आंबा उत्पादनाबरोबरच निर्यात व स्थानिक विक्रीतुन चांगला दर शेतकऱ्याला मिळावा या दृष्टीने कार्यशाळा उपयुक्त होईल. ‘निर्यातक्षम आंबा उत्पादन व निर्यात’ या कार्यशाळेस प्रवेश विनामुल्य असून कार्यशाळेला जिल्हयातील जास्तीत-जास्त शेतकरी, व्यापारी, प्रक्रियाकार, निर्यातदार, शेतकरी उत्पादक कंपनी, आंबा उत्पादक संघ, सहकारी संस्था यांचे प्रतिनिधी उपस्थित रहावे असे आवाहन मंडळाचे उपसरव्यवस्थापक डॉ.भास्कर ना. पाटील यांनी केले आहे.
