घरच्या मैदानावर टीम इंडियाने ऑस्ट्रेलियावर 2-1 असा मालिका विजय मिळवला. या मालिकेमध्ये कर्णधार विराट कोहली, हिटमॅन रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह आणि रविंद्र जाडेजा यांनी दमदार कामगिरी केली. याचेच फळ त्यांना आयसीसीच्या ताज्या क्रमवारीमध्ये मिळाले आहे. एक दिवसीय क्रमवारीमध्ये (ICC Men’s ODI Team Rankings) विराट कोहली पहिल्या स्थानावर, तर रोहित शर्मा दुसऱ्या स्थानावर विराजमान आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेमध्ये विराटने दोन अर्धशतक ठोकली, तर रोहितने अखेरच्या एक दिवसीय सामन्यात निर्णायक शतकी खेळी केली. याचा दोघांनाही फायदा झाला आहे. ताज्या क्रमवारीत विराटच्या रेटिंगमध्ये दोन गुणांचा, तर रोहितच्या रेटिंगमध्ये तीन गुणांची वाढ झाल्याचे दिसते. विराट कोहलीचे आता 886 पॉइंट्स झाले आहेत, तर रोहित शर्माचे 868 पॉइंट्स आहेत. गोलंदाजांच्या क्रमवारीमध्ये जसप्रीत बुमराह पहिल्या स्थानावर विराजमान आहे. तर अष्टपैलू खेळाडूंच्या यादीमध्ये रवींद्र जाडेजा याने टॉप 10 मध्ये जागा मिळवली आहे.
