‘…तर आणि तरच रोखता येईल कोरोनाची तिसरी लाट’; आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी स्पष्टच सांगितलं

0

मुंबई : राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्यानं घट होत आहे. कोरोनाची दुसरी लाट ओसरली आहे. मात्र तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे. तिसऱ्या लाटेचा धोका टाळण्यासाठी राज्यभरात लसीकरण मोहीम वेगानं राबवली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपेंनी आज माध्यमांच्या प्रतिनिधींनी संवाद साधला. यावेळी त्यांनी डेल्टा प्लस व्हेरिएंटबद्दल दिलासादायक माहिती दिली.

राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक कमी होत असताना लसीकरणाचा वेग वाढवण्याचं काम सुरू आहे. राज्यातील ७० टक्के लोकसंख्येला लस दिली गेल्यास तिसऱ्या लाटेची दाहकता कमी जाणवेल. कोरोनाची लाट रोखण्याचा लसीकरण हाच एकमेव उपाय आहे. त्यामुळे नागरिकांनी लसीकरणासाठी पुढाकार घ्यावा. लसीकरण वेगानं झाल्यास आपण कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची तीव्रता कमी करण्यात यशस्वी होऊ, असा विश्वास आरोग्य मंत्र्यांनी व्यक्त केला.

डेल्टा प्लस व्हेरिएंट आणि नव्या निर्बंधांवबद्दलही डॉ. टोपेंनी भाष्य केलं. ‘कोरोनाचा नवा व्हेरिएंट आढळून आल्यानं नवे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. नागरिकांनी हलगर्जीपणा टाळावा. डेल्टा प्लसचे रुग्ण शोधण्यासाठी जीनॉम सिक्वेन्सिंग सुरू आहे. एका जिल्ह्यातून महिन्याला १०० नमुने गोळा केले जात आहेत. चाचण्यांचं प्रमाण वाढवण्याचे आदेश देण्यात आले आहेत,’ असं डॉ. टोपे यांनी सांगितलं.

राज्यात आतापर्यंत डेल्टा प्लसचे २१ रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी एका व्यक्तीचा मृत्यू झाला. त्या व्यक्तीच्या मृत्यूला पूर्णपणे डेल्टा प्लस कारणीभूत आहे असं म्हणता येणार नाही. कारण त्या व्यक्तीचं वय ८० वर्षांपेक्षा जास्त होतं. त्यांना अनेक गंभीर आजार होते. डेल्टा प्लसची लागण झालेले इतर २० रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे चिंता करण्यासारखं कारण नाही, असं टोपे म्हणाले. राज्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रं, उपकेंद्रं, शासकीय रुग्णालयं, खासगी रुग्णालयांमध्ये लसीकरण वेगानं सुरू आहे. लसीकरण हाच कोरोना संकट रोखण्याचा सर्वात प्रभावी मार्ग आहे, असं त्यांनी सांगितलं.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
6:41 PM 29-Jun-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here