अवैध मासेमारी रोखण्यासाठी मत्स्य विभागाची नामी शक्कल

0

रत्नागिरी : पावसाळी बंदीनंतर जिल्ह्याच्या समुद्रात सुरु होणारी अवैध मासेमारी रोखण्यासाठी सहाय्यक मत्स्यव्यवसाय विभागाने शक्कल लढवली आहे. आता सर्व मच्छीमार नौका बंदरांमध्ये, जेटींवर उभ्या आहेत. या नौकांची नावे आणि नंबर घेऊन ते कार्यालयातील विविध परवान्यांच्या नोंदींमध्ये तपासले जाणार आहे. ज्या नौकांचे नाव आणि नंबर नोंदी नसतील अशा नौकांना शोधून कारवाई केली जाणार आहे. सहाय्यक मत्स्यव्यवसाय आयुक्त एन. व्ही. भादुले यांनी सर्व परवाना अधिकार्‍यांना सूचना करून बंदर आणि जेटींवर उभ्या असलेल्या मच्छीमार नौकांची नावे आणि नंबर संकलीत करण्यास सांगितले आहे. रत्नागिरी जिल्ह्याला 167 कि.मी. चा समुद्रकिनारा लाभला आहे. या किनार्‍यांवर 46 ठिकाणी मासळी उतरविण्याची ठिकाणे म्हणजे बंदर, जेटी आहेत. जिल्ह्यात एकूण 3 हजार 519 मच्छीमार नौका आहेत. यामध्ये 3 हजार 77 यांत्रिकी तर 442 बिगर यांत्रिकी नौका आहेत. या अधिकृत नौकांव्यतिरिक्त इतर अनधिकृत नौका आहेत की नाही, याचा शोध घेण्यासाठी  आणि पर्यायाने अवैध मासेमारी रोखण्यासाठी मत्स्यव्यवसाय विभागाने उभ्या असलेल्या नौकांचे नाव आणि नंबर घेण्याची शक्कल लढवली आहे. या नाव आणि नंबरातील नौकांच्या नोंदी मत्स्यव्यवसाय विभागाच्या दफ्तरी नसतील त्या नौका अवैध आहेत हे स्पष्ट होणार आहे. त्यानुसार कारवाई करणे सुलभ होणार आहे. सहाय्यक मत्स्यव्यवसाय विभागाच्या या नियोजनानूसार ज्या नौका अनधिकृत आढळून येणार आहेत त्यांची माहिती मच्छीमार सहाकारी संस्थांना कळवण्यात येणार आहे. काही बेकायदेशीर नौका अशा संस्थांचे सदस्य असल्याचा संशय आहे. त्या नौकांना सवलतीचे इंधन दिले जाऊ नये, असे मत्स्यव्यवसाय विभागाकडून कळवले जाणार आहे. इतकेच नव्हे तर ज्या संस्थांनी कोणत्याही अनधिकृत किंवा बेकायदेशीर नौकांना सलवतीचे डिझेल पुरविले असेल आणि त्याचा परतावा घेतला गेला असेल तर त्या नौका मालकाला राहिलेला आणि पुढचा डिझेल परतावा दिला जाणार नाही याचीही नोटीस बजावली जाणार आहे. ज्या अनधिकृत नौका मालकांनी डिझेल परतावा या पूर्वी स्विकारला आहे तो परत घेण्याबाबतची कारवाई केली जाणार आहे. कोणत्याही अधिकृत मासेमारी नौकेची नोंदणी केलेेली असते. मासेमारी परवाना असतो. ज्या मासेमारी पद्धतीचा परवाना असतो त्याच जाळ्याने किंवा साधनांनी मासेमारी करता येते. नमुना 5 हे बंदर नोंदणी पत्र आवश्यक असते. नौकेचा विमा काढणे बंधनकारकर असते. नौकांवरील खलाशी, तांडेल यांची माहिती आवश्यक असते. या माहितीबरोबर त्या नौकांवरील खलाशी आणि तांडेलांचे ओळखपत्र सुद्धा असावे लागते. या सर्व प्रकारच्या नोंदी सहाय्यक मत्स्यव्यवसाय विभागाकडे कराव्या लागतात. त्यानुसार सहाय्यक मत्स्यव्यवसाय विभागाकडून मासेमारीची परवानगी दिली जाते. याच सर्व नोंदी आणि बंदर आणि जेटींवर उभ्या असलेल्या नौकांचे नाव आणि नंबरची पडताळणी केली जाणार आहे. त्यातून बेकायदेशीर किंवा अवैध मासेमारी कोणत्या नौकांकडून होत आहे, हे स्पष्ट होणार असून त्यानुसार कारवाई केली जाणार आहे. 

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2YNJN6A
10:54 AM 30-Jun-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here