“सत्तेच्या नशेत धुंद असलेल्या ठाकरे सरकारने परिणाम भोगायला तयार राहावे”

0

मुंबई : आषाढी एकादशीला अवघे काही दिवस राहिलेले आहेत. मानाच्या पालख्यांची पंढरपूरला जाण्याची तयारीही जोरात सुरू आहे. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाही पायी वारीला ठाकरे सरकारने परवानगी नाकारली आहे. यावरून भाजपने पुन्हा एकदा ठाकरे सरकारवर टीका केली आहे. सत्तेच्या नशेत धुंद असलेल्या ठाकरे सरकारने परिणाम भोगायला तयार राहावे, अशा इशारा भाजपप्रणित अध्यात्मिक आघाडीकडून देण्यात आला आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने पंढरपूरच्या पायी वारीवर निर्बंध घातले आहेत. केवळ मानाच्या पालख्यांनाच पंढरपुरात प्रवेश देण्यात येणार आहे. आषाढी एकादशीच्या काळात पंढरपुरात संचारबंदी लागू होऊ शकते. या एकूण पार्श्वभूमीवर भाजपप्रणित अध्यात्मिक आघाडीचे प्रमुख तुषार भोसले यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.

यंदाची आषाढीची पायी वारी कोणत्याही परिस्थितीत होणार म्हणजे होणारच. सत्तेच्या नशेत धुंद असलेल्या राज्य सरकारने वारकऱ्यांची मागणी धुडकावली आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी परिणामांना सामोरे जाण्याची तयारी ठेवावी. मायबाप वारकऱ्यांनी शेवटपर्यंत सरकारच्या निर्णयाची आतुरतेने वाट पाहिली. सविनय कायदेभंग काय असतो ते इंग्रजांनंतर या जुलमी सरकारला लवकरच दिसेल, अशा इशारा भोसले यांनी दिला आहे.

यंदाच्या आषाढी वारीसंदर्भात राज्य सरकारने घेतलेला निर्णय वारकऱ्यांना मान्य नाही. हा निर्णय घेऊन राज्य सरकारने वारकऱ्यांचा अपमान केला आहे. सरकारने हा निर्णय तातडीने बदलावा. अन्यथा रस्त्यावर असंख्य पालख्या उतरतील. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यास त्याला उपमुख्यमंत्री अजित पवार जबाबदार असतील, असे तुषार भोसले यांनी म्हटले.

दरम्यान, आषाढी एकादशीसाठी मानाच्या १० पालख्यांना एसटी बसने पंढरपूरकडे प्रस्थान करता येणार आहे. तर वाखरीपासून दीड किलोमीटर अंतर पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांना चालत जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्याचबरोबर विठ्ठल-रुख्मिणीच्या शासकीय महापूजाही नियम पाळूनच होणार आहे. आषाढी एकादशीला सरकारने परवानगी दिलेल्या संत महाराज मंडळींना विठ्ठलाचे मुखदर्शन घेता येणार आहे. काल्याचा कार्यक्रम झाल्यानंतर सर्व पालख्या परत फिरतील, असे राज्य सरकारकडून यापूर्वी स्पष्ट करण्यात आले आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:12 PM 30-Jun-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here