मंडणगड, दापोली, गुहागर व खेड येथील रुग्ण दापोलीतील उपजिल्हा रुग्णालयाचा लाभ घेतात. दापोलीच्या उपजिल्हा रुग्णालयाची ओपीडी संख्या जिल्ह्यातील इतर उपजिल्हा रुग्णालयापेक्षा निश्चितच अधिक आहे. सध्या या उपजिल्हा रुग्णालयाला वैद्यकीय अधिकाऱ्यांबरोबरच इतर साधनसामुग्रीच्या कमतरतेने ग्रासले आहे. सध्या इथे वैद्यकीय अधिकाऱ्यांबरोबरच इतर साधनसामुग्रीची कमतरता भासत आहे. या रुग्णालयाची अवस्था एवढी बिकट झाली आहे की उपजिल्हा रुग्णालयालाच सलाईन लावण्याची वेळ आली आहे, अशी तेथील सर्वसामान्यांची प्रतिक्रिया आहे.परिणामी, शासनाने आरोग्य व्यवस्थेकडे लक्ष द्यावे, असेही तेथील ग्रामस्थांची मागणी आहे. यामध्ये प्रामुख्याने वैद्यकीय सेवा देण्यासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांची कमतरता दिसून येत आहे. तर कंत्राटी वैद्यकीय अधिकारी जिल्ह्यात काम करण्यासाठी नाराज असल्याचे दिसून येते; याला कारण देखील तसेच आहे. सरकारी काम दहा महिने थांब या उक्तीप्रमाणे सरकारी रुग्णालयात काम करणाऱ्या डॉक्टरांना त्यांचे मानधन वेळेत मिळत नाही.
