मराठमोळ्या कला दिग्दर्शकाच्या आत्महत्येने खळबळ; मनोरंजनसृष्टीतली युनियन्सची दहशत पुन्हा उघड

0

मुंबई : अभिनेता सुशांतसिंग राजपूतच्या आत्महत्येपासून चित्रपट क्षेत्राशी संबंधित कलाकारांच्या आत्महत्या चर्चेचा विषय बनत आहे. आता, आणखी एका कलाकाराने व्हिडिओ पोस्ट करुन आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं आहे. मराठी सिनेमा आणि टेलिव्हीजन इंडस्ट्रीत कला दिग्दर्शक म्हणून काम करणाऱ्या राजू सापते यांनी आज आत्महत्या करुन आपलं जीवन संपवलं. तत्पूर्वी एक सुसाईड व्हिडिओही त्यांनी बनवला आहे. या व्हिडिओमुळे मराठी मनोरंजनसृष्टीत खळबळ उडाली आहे.

साप्ते यांनी आपल्या पुण्यातील घरात आत्महत्या करण्यापूर्वी एक व्हिडीओ तयार केला, त्यामध्ये आत्महत्येचं कारण सांगितल आहे. ‘नमस्कार मी राजेश मारुती सापते. मी एक आर्ट डिरेक्टर आहे. मी आता कोणतीही नशा केलेली नाही. पूर्ण विचाराअंती मी आता हा निर्णय घेत आहे. कारण मला काही गोष्टींचा खूप त्रास होत आहे. हा व्हिडीओ बनवताना मी भानावर आहे. गेल्या काही दिवसांपासून मला लेबर युनियनमधल्या राकेश मौर्या यांच्याकडून खूप त्रास दिला जात आहे. मी आतापर्यंत केलेल्या कामाचे कोणतेही पैसे थकीत नाहीत, सर्व पेमेंट पूर्ण झालेलं असतानाही राकेश मोर्या कामगारांना भडकवत आहेत. त्यामुळे माझे अनेक प्रोजेक्ट अडकले आहेत.

माझं पुढचं काम राकेश मोर्या सुरु करु देत नाहीत. माझ्याकडे सध्या ५ प्रोजेक्ट आहेत. पण, राकेश मौर्या कामगारांना माझ्याविरुद्ध भडकवत असल्यामुळे मला कोणतही काम सुरु करता येत नाहीये. एक प्रोजेक्ट मला याच कारणामुळे सोडावं लागलं. या गोष्टीचा निषेध म्हणून मी आत्महत्या करत असल्याचं सापते यांनी व्हिडिओत म्हटलं आहे. तसेच, मला न्याय मिळावा अशी मागणीही त्यांनी याच व्हिडिओतून केली आहे.

दरम्यान, राजू सापते यांच्या आत्महत्ये प्रकरणी वाकड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास करण्यात येत आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:01 PM 03-Jul-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here