मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाच्या कामातील ठेकेदाराच्या मनमानीमुळे जागा मालक, शेतकरी आणि प्रवासी पुरते त्रस्त झाले आहेत. महामार्गावर अनेक ठिकाणी वाजवीपेक्षा जास्त जागा घेत मोठ्या प्रमाणावर केलेल्या खोदकामामुळे जागा मालकांच्या शेती आणि घरांना धोका निर्माण झाला असून अनेक ठिकाणी खोदण्यात आलेल्या खड्ड्यांमुळे गंभीर अपघात होण्याचा धोका निर्माण झाला आहे. मात्र या एकूणच प्रकरणी स्थानिक प्रशासन आणि लोकप्रतिनिधी मात्र बघ्याच्या भूमिकेत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या ठेकेदाराच्या मनमानीला रोखणार कोण असा सवाल आता जनतेतून उपस्थित केला जात आहे. मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सध्या वेगात सुरू आहे. राजापूर तालुक्यात वाटूळ ते पन्हळे टाकेवाडी असा सुमारे ३७ किलोमीटरचा मार्ग जातो. सध्या या भागात अत्यंत वेगाने काम सुरू आहे. मात्र या कामाच्या दर्जाबाबत साशंकता व्यक्त केली जात असून अत्यंत घाईगडबडीत हे काम उरकले जात आहे. हे काम करताना अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर जागा अधिग्रहित करण्यात आली व त्यानंतर खोदकाम करण्यात आले. प्रत्यक्षात रस्त्याचे काम करताना अनावश्यक जागा पडून राहिली असून या ठिकाणी करण्यात आलेल्या खोदकामामुळे जागा मालकांचे मोठे नुकसान झाले आहे. कोंडये, हातिवले, कोदवली, नेरके, खरवते, ओणी व वाटूळ परिसरात अनेक जागा मालकांची अवाजवी जागा अधिग्रहीत करण्यात आली व सध्या या जागेत खोदकाम करून ठेवण्यात आले आहे. तर काही ठिकाणी शेतातही माती व दगड गेले असून शेती करणे मुश्कील झाले आहे. काही ठिकाणी मोऱ्या टाकणे व गटर बांधणेसाठी खोदकाम करून ठेवण्यात आले आहे. मात्र मोठ्या स्वरूपात खोदकाम केल्याने या ठिकाणी असलेल्या खड्यांमध्ये जनावरे पड़न जखमी होत आहेत. तर काहींच्या घरासमोरच मोठया प्रमाणावर खोदकाम करून मातीचे ढिगारे ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे.या ठेकेदाराकडून जुन्या रस्त्याची वाहतुकीला योग्य देखभाल केली जात नसल्याने वाहन चालक व प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. मोठ्या प्रमाणार रस्त्यावर माती आल्याने धुळीचा सामना करावा लागत आहे. या एकूणच प्रकरणी स्थानिक प्रशासन आणि लोकप्रतिनिधी मात्र भूग गिळून गप्प आहेत. त्यामुळे जनतेतून संताप व्यक्त होत आहे.
