…आणि भास्कर जाधवांनी अध्यक्षांच्या खुर्चीतून स्वतःचीच मागणी केली मान्य, दिले कारवाईचे आदेश

0

मुंबई : राज्य सरकारच्या दोन दिवसीय पावसाळी अधिवेशनात सावळा गोंधळ पाहायला मिळाला. मराठा आरक्षण, ओबीसींचे राजकीय आरक्षण, MPSC भरती यांसारख्या मुद्द्यांवरून भाजपने ठाकरे सरकारची कोंडी केल्याचे दिसले. तसेच पहिल्याच दिवशी भाजपच्या १२ आमदारांच्या निलंबनाचा मुद्दाही जोरदार गाजला. दुसऱ्या दिवशी भाजप आमदारांनी आक्रमक भूमिका घेत प्रती विधानसभा स्थापन केली. यावरून भास्कर जाधव यांच्या एका कृतीने सर्वांचेच लक्ष वेधले.

झाले असे की, पहिल्या दिवशी १२ आमदारांचे निलंबन केल्यामुळे भाजपने अधिक आक्रमक होत दुसऱ्या दिवशीच्या कामकाजावर बहिष्कार टाकला. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत भाजपच्या आमदारांनी विधान भवनाच्या आवारात प्रती विधानसभा स्थापन केली. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी सरकार विरोधात निषेध ठराव मांडला. भाजपकडून माईक आणि लाऊड स्पीकरचा वापर करुन भाषणे देण्यात आली. तसेच या प्रती विधानसभेचे थेट प्रक्षेपण देखील करण्यात आले. यावर शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी आक्षेप घेत कारवाई करण्याची मागणी केली.

विधान भवनातील भाजपच्या कृतीचे पडसाद विधानसभा सभागृहात उमटले. अशाप्रकारे विधान भवनाच्या आवारात संसदीय कामकाजाशिवाय कुठलेही कामकाज करायचे असेल, तर त्यासाठी विधानसभा अध्यक्षांची परवानगी घेणे आवश्यक आहे. पत्रकारांनाही ठराविक भागाच्या पुढे जाण्याची किंवा प्रवेश करण्याची परवानगी नसते. विधानभवनाच्या पायऱ्यांवर बसून निषेध व्यक्त करणे हा सगळ्यांचा अधिकार आहे. मात्र, कुठल्याही परवानगीशिवाय विधानभवनाच्या पायऱ्यांवर माईक आणि स्पीकर लाऊन भाषणे करण्यात येत आहेत. त्यामुळे या विरोधात कारवाई करण्यात यावी, अशी मागणी भास्कर जाधव यांनी केली.

काही कालावधीनंतर भास्कर जाधव तालिका अध्यक्ष म्हणून विधानसभा अध्यक्षांच्या स्थानी विराजमान झाले. आणि विधानसभा अध्यक्ष म्हणून माईक आणि स्पीकर बंद करण्याचे, तसेच प्रती विधानसभेचे थेट प्रक्षेपण तात्काळ बंद करण्याचे आदेश दिले. त्यांच्या आदेशानुसार मार्शलनी कारवाई करत भाजप आमदरांकडून माईक हिसकावून घेतले आणि थेट प्रक्षेपण थांबवले.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:25 PM 06-Jul-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here