मराठमोळ्या नेत्याला मोदींकडून मोठी संधी?; पहिल्याच रांगेत नारायण राणेंना स्थान

0

नवी दिल्ली : मोदी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराला आता थोडाच अवधी राहिला आहे. मोदींच्या मंत्रिमंडळातील अनेक बड्या नेत्यांनी राजीनामे दिले आहेत. आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्यासह महत्त्वाच्या मंत्रालयांचा कार्यभार असलेल्या नेत्यांनी राजीनामे दिले आहेत. त्यामुळे आज होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात नावं असलेल्या काहींना महत्त्वाची खाती मिळू शकतात. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी थोड्याच वेळापूर्वी संभाव्य मंत्र्यांशी संवाद साधला.

पंतप्रधान मोदी संभाव्य मंत्र्यांशी संवाद साधत असल्याचे दोन फोटो समोर आले आहेत. यापैकी एक फोटो समोरून काढण्यात आलेला आहे. यात सर्व संभाव्य मंत्री दिसत आहेत. फिजिकल डिस्टन्सिंग आणि मास्क असल्यानं सर्व उपस्थितांचे चेहरे नीट दिसत नाहीत. मात्र पहिल्या रांगेतील सर्वांचे चेहरे ओळखू येत आहेत. मोदींच्या उजव्या बाजूला पहिल्याच रांगेत भाजप खासदार नारायण राणे आहेत. राणेंना पहिल्याच रांगेत स्थान देण्यात आल्यानं त्यांना केंद्रीय मंत्रिमंडळात मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे.

नारायण राणे यांच्या शेजारी काही अंतरावर सर्वानंद सोनोवाल आहेत. आसामचं मुख्यमंत्रिपद हिमंता बिस्व सरमा यांच्यासाठी सोडणाऱ्या सोनोवाल यांना महत्त्वाचं खातं मिळू शकतं. पक्ष नेतृत्त्वाच्या एका आदेशावर मुख्यमंत्रिपद सोडल्याचं बक्षीस त्यांनी मिळू शकेल. सोनोवाल यांच्या शेजारी भाजपचे खासदार ज्योतिरादित्य सिंधिया आहेत. सिंधिया यांनी त्यांच्या समर्थक आमदारांसह काँग्रेसला रामराम केला. त्यामुळेच मध्य प्रदेशात भाजपची सत्ता आली. त्यामुळे सिंधिया यांच्याकडेही मोठी जबाबदारी दिली जाऊ शकते.

सिंधिया यांच्या शेजारी, मोदींच्या अगदी डावीकडे संयुक्त जनता दलाचे (जेडीयू) राष्ट्रीय अध्यक्ष आरसीपी सिंह आहेत. त्यांच्याकडेदेखील महत्त्वाचं मंत्रालय दिलं जाऊ शकतं. जेडीयूनं मोदींकडे ४ मंत्रिपदं मागितली आहेत. मोदींनी आतापर्यंतच कोणत्याच मित्रपक्षाला एकापेक्षा अधिक मंत्रिपदं दिलेली नाहीत. त्यामुळे जेडीयूची मागणी पूर्ण होते का, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. राणे यांच्यामागे बसलेल्या पशुपती पारस यांना महत्त्वाचं खातं मिळू शकतं. लोकजनशक्ती पक्षाचे खासदार असलेल्या पारस यांनी चिराग पासवान यांची गोची करत संपूर्ण पक्षच ताब्यात घेतला आहे. त्यांच्या या राजकीय खेळीमुळे गेल्याच महिन्यात ते चर्चेत आले होते.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:27 PM 07-Jul-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here