शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्यांसाठी जिल्हा परिषदेत लगबग सुरू झाली आहे. सप्टेंबर २०१९ मध्ये सर्वाधिक वादाचा विषय ठरलेल्या शिक्षक आंतरजिल्हा बदल्यांसाठी कार्यवाही हाती घेण्यात आली आहे. बदल्यांसाठी वेळापत्रक तयार करण्यात आले असून १० फेब्रुवारीपर्यंत शिक्षकांना ऑनलाईन संगणकीय प्रणालीद्वारे अर्ज भरण्याची मुदत देण्यात आली आहे. शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्यांचा विषय दरवर्षी चर्चेचा आणि वादाचा ठरतो. सप्टेंबर २०१९ मध्ये तत्कालीन सीईओ आंचल गोयल यांच्या कार्यकाळात झालेल्या आंतरजिल्हा बदल्या संपूर्ण राज्यात गाजल्या होत्या. पदाधिकाऱ्यांचा विरोध डावलून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार पोलीस बंदोबस्तात आचंल गोयल यांनी शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्यांची प्रक्रिया पूर्ण केली होती. यानंतर हा वाद वाढून सीईओ आंचल गोयल यांच्यावर अविश्वास ठराव दाखल करण्याची तयारी सत्ताधारी शिवसेनेने केली होती. यापूर्वीच आंचल गोयल यांची बदली झाल्याने अविश्वास ठरावाचे संकट टळले होते. दरम्यान, आता नव्याने शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्यांसाठी वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे. या बदल्यांसाठी शिक्षकांची बिंदू नामावली विभागीय आयुक्तांकडून अंतिम करण्यात आली आहे. राज्यातील सर्व जिल्हा परिषदांमधील प्राथमिक शिक्षकांची आंतरजिल्हा बदली प्रक्रियेचा चौथा टप्पा १९ जानेवारी पासन सुरू करण्यात आला आहे. आंतरजिल्हा बदली प्रक्रियेसाठी प्राथमिक शिक्षकांना १० फेबुवारीपर्यंत ऑनलाईन पध्दतीने अर्ज करता येणार आहे. आंतरजिल्हा बदल्या करताना १० टक्क्यापेक्षा जास्त जागा रिक्त असणाऱ्या जिल्हा परिषदेतून आंतरजिल्हा बदलीने शिक्षकांना बाहेर जाता येणार नाही. शिक्षकाच्या नियुक्ती प्रवर्गानुसार बदलीने बाहेर जाण्याच्या जिल्हा परिषदेत संबंधित प्रवर्गाचे पद रिक्त असणे अनिवार्य असणार आहे असे एकूण आठ नियम आंतरजिल्हा बदल्यांसाठी निश्चित करण्यात आले आहेत. शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्यांची प्रक्रिया सुरू झाली असली तरी सत्ताधारी या बदल्यांबाबत कोणती भूमिका घेतात याकडे नजरा लागल्या आहेत. जिल्ह्यात शिक्षकांच्या रिक्त पदांची संख्या मोठी आहे. गतवर्षीच आंतरजिल्हा बदलीने शिक्षक सोडल्यानंतर सदस्यांनी मोठा हंगामा केला होता. बदलीने जाणाऱ्या शिक्षकांच्या तुलनेत येणाऱ्या शिक्षकांची संख्या फार कमी असल्याने रिक्त पदांचा ताण आणखी वाढत असल्याने बदलीबाबत सत्ताधारी काय निर्णय घेणार याकडे नजरा आहेत.
