कोरोनात सत्कार समारंभ टाळा, लगेचच कामाला लागा; पंतप्रधान मोदींचा नव्या मंत्र्यांना संदेश

0

नवी दिल्ली : कोरोनाच्या काळात सत्कार आणि सोहळे यांना फाटे द्या. जनतेत जा. त्यांचे प्रश्न समजून घ्या. सोशल मीडिया वा एकूणच माध्यमे यांना मुलाखती टाळा. मात्र घेतलेल्या निर्णयांची नीट माहिती द्या, असा मंत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नव्या मंत्र्यांना दिला. केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतरच्या दुसऱ्याच दिवशी गुरुवारी पंतप्रधान मोदी यांनी सायंकाळी आधी कॅबिनेट मंत्री व नंतर राज्यमंत्री यांची बैठक घेतली. त्यावेळी ते म्हणाले की, नव्या मंत्र्यांनी आठवड्याचे पाच दिवस दिल्लीत थांबून आपापल्या मंत्रालयाचा, कामाचा अभ्यास करावा. अधिकाऱ्यांकडून माहिती घ्यावी, पण त्यांच्या सल्ल्यांवर अवलंबून राहू नका, अशा सूचना भाजपने सर्व मंत्र्यांना दिल्याचे सांगण्यात आले. कोरोनावर नियंत्रण, उद्योग व अर्थचक्र पुन्हा रुळावर आणणे, शेती व शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यावर भर आणि त्यांच्या मनातील गैरसमज दूर करणे यावर भर देणे आवश्यक आहे, असेही मंत्र्यांना सांगण्यात आल्याचे समजते.

गुरुवारी नव्या केंद्रीय मंत्र्यांनी आपल्या खात्यांची सूत्रे स्वीकारली. नवे केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मंडाविया, लघू व मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे, रेल्वे व माहिती-तंत्रज्ञानमंत्री अश्विनी वैष्णव, ऊर्जामंत्री आर. के. सिंह, माहिती-प्रसारणमंत्री अनुराग ठाकूर, कायदामंत्री किरण रिजिजू आदींनी त्यांच्या खात्याचा पदभार स्वीकारून कामाला सुरुवात केली; तसेच आपल्याला ही संधी दिल्याबद्दल सर्व मंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले. डॉ. भागवत कराड, डॉ. भारती पवार, कपिल पाटील या नव्या राज्यमंत्र्यांनीही पदभार स्वीकारला. केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी कोळसा मंत्रालयाची सूत्रे प्रल्हादभाई पटेल यांच्याकडून स्वत:कडे घेतली. केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री मीनाक्षी लेखी, धर्मेंद्र प्रधान, हरदीप पुरी, मुंजपारा महेंद्रभाई, भूपेंदर यादव, जॉन बारला आदी मंत्र्यांनीही गुरुवारी आपापल्या खात्याची सूत्रे स्वीकारली.

नव्या मंत्र्यांनी कशा प्रकारे कारभार करावा, तसेच त्यांच्याकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींना व पक्षाला नेमके काय अपेक्षित आहे, याविषयी भाजपचे अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा यांनी गुरुवारी संध्याकाळी मंत्र्यांना मार्गदर्शन केले.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:09 PM 09-Jul-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here