मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे अयोध्येत जाणार असल्याचे शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी जाहीर केले आहे. राज्य सरकारला शंभर दिवस पूर्ण होताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अयोध्येला जातील. तसेच, श्रीरामाचे दर्शन घेऊन पुढील कार्याची दिशा ठरवतील, असेही संजय राऊत यांनी म्हटले आहे. याचबरोबर, प्रभू श्रीरामाची कृपेने महाविकास आघाडीचे सरकार जोरात कामास लागले आहे. हे सरकार पाच वर्षे पूर्ण करणार असल्याचा विश्वासही संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे. संजय राऊत यांनी याबाबत ट्विट केले आहे. ते म्हणाले, “सरकार जोरात कामास लागले आहे. पाच वर्षे पूर्ण करणारच!प्रभू श्रीरामाची कृपा. सरकारला शंभर दिवस पूर्ण होताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अयोध्येस जातील. श्रीरामाचे दर्शन घेऊन पुढील कार्याची दिशा ठरवतील.”
