रत्नागिरी : जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्या वतीने मान्सूनपूर्व पाण्याच्या स्रोताचे स्वच्छता सर्वेक्षण करण्यात आले असून, 845 ग्रामपंचायतींना हिरवे कार्ड देण्यात आले आहे. एका ग्रामपंचायतील पिवळे कार्ड तर एकाही ग्रामपंचायतीला रेड कार्ड मिळालेले नाही. पिण्याच्या पाण्यासाठी आपल्याकडे सार्वजनिक पाणीपुरवठा नळयोजना, विहीर, बोअरवेल, हातपंप हे स्रोत आहेत. सर्वच स्रोत पिण्यास योग्य असतीलच असे नाही. बर्याचदा अनेक पाणी स्रोतात काही घटकांची कमतरता आढळून येते तर काही घटक जास्त प्रमाणात असतात. शरिरावर याचा परिणाम होवू शकतो. आजारांची लागण होण्याची शक्यता असते. त्यामुळे पाणी नमुन्यांचे सर्वेक्षण करुन तपासणी करण्यात येते. प्रयोगशाळेत नमुन्यांची तपासणी करण्यात येते. तपासणीत हे पाणी पिण्यास योग्य आहे किंवा नाही कळते. पाण्यात काही घटकांची कमतरता असल्यास किंवा काही घटकांचे प्रमाण वाढल्यास त्याबाबत उपाययोजना करण्यात येतात. पावसाळ्यामध्ये साथरोगांची लागण होण्याचे प्रमाण मोठे असते व बहुतेक व्याधी या पाणी दूषित झाल्याने व परिसराची स्वच्छता करण्याकडे दुर्लक्ष केल्याने उद्भवतात. त्यामुळे या पाणी स्रोतांची स्वच्छता करण्यासाठी ग्रामपंचायतींना सूचना दिल्या जातात. ग्रामपंचायतींनी या बाबींचे पालन करुन स्वच्छता मोहीम सातत्याने राबवून परिसर स्वच्छ ठेवणे अपेक्षित असते. जिल्हा आरोग्य विभागाकडून स्वच्छता सर्वेक्षण करण्यात येते. मान्सूनपूर्व आणि मान्सूनपश्चात अशा दोन टप्प्यात ही मोहीम हाती घेण्यात येते. यावर्षी 1 ते 30 एप्रिल या कालावधीत मान्सूनपूर्व स्वच्छता सर्वेक्षण करण्यात आले. जिल्ह्यातील 846 ग्रामपंचायतींचे स्वच्छता सर्वेक्षण करण्यात आले. सर्वेक्षण करण्यात आलेल्या 846 ग्रामपंचायतींपैकी राजापूर तालुक्यातील केवळ सोलगाव ग्रामपंचायतीला पिवळे कार्ड देण्यात आले आहे. तर 845 ग्रामपंचायतींना हिरवे कार्ड देण्यात आले आहे. हिरवे कार्ड मिळालेल्या ग्रामपंचायतींमध्ये मंडणगड तालुक्यातील 49 ग्रामपंचायती, दापोली तालुक्यातील 106, खेड 114, गुहागर 66, चिपळूण 130, संगमेश्वर 126, रत्नागिरी 94, लांजा 60 आणि राजापूर तालुक्यातील 100 ग्रामपंचायतींचा समावेश आहे.
