राष्ट्रपती पदकाने सन्मानित गुरुवर्य स्व. अच्युतराव पटवर्धन यांचे शिल्प ११८ वर्षांचा इतिहास लाभलेल्या पटवर्धन हायस्कूलमध्ये साकारण्यात येणार आहे. खुर्चीवर बसलेले गुरुजी अशा स्वरूपाचे हे शिल्प असून ‘पटवर्धन हायस्कूल माजी विद्यार्थी संघाने’ हे शिल्प येत्या वर्षभरात पूर्ण करण्याचा संकल्प सोडला आहे. मेघडंबरीसह हे शिल्प दिमाखात उभे करण्याकरिता भारत शिक्षण मंडळानेही पाठिंबा दिला आहे. पटवर्धन हायस्कूल माजी विद्यार्थी संघाचा पाचवा वर्धापनदिन आणि स्नेहमेळावा शाळेच्या ठाकूर सभागृहात झाला. यावेळी सदस्य दिलीप भाटकर यांनी सांगितले की, चार पिढ्यांना घडवणारे अच्युतराव यांचे शिल्प उभे करण्यासाठी तीन-चार वर्षे प्रयत्न सुरू आहे. कोल्हापूरच्या शिल्पकाराकडून ब्राँझचे शिल्प तयार करून घेतले जाणार आहे. यासाठी साडेतीन लाख रुपये प्रस्तावित असून पूर्ण प्रकल्पासाठी पाच लाखाचा निधी आवश्यक आहे. आगामी काळात कौशल्य विकासाच्या दृष्टीने माजी विद्यार्थी संघाने काम केले पाहिजे. माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष डॉ. दिलीप नागवेकर यांनी सांगितले, २१ जानेवारी २०१६ रोजी संघाला प्रमाणपत्र मिळाले. विद्यार्थ्यांना रोजगार मिळण्यासाठी उपक्रम, कृषी श्रमसंस्कार शिबिर घेतले, माजी विद्यार्थी मेळावा, स्पर्धा, वृक्षारोपण, फळप्रक्रिया प्रशिक्षण कार्यक्रम, मिरी रोप वाटप असे कार्यक्रम राबविण्यात आले. भारत शिक्षण मंडळाचे अध्यक्ष नंदकुमार साळवी यांनी शिल्प उभारणीस पाठिंबा दिला. प्रत्येक बॅचनुसार विद्यार्थी मेळावे घेऊन संपर्क साधण्यास त्यांनी सुचवले. शाळेत आणखी एक नवी वास्तू प्रस्तावित आहे. कोणत्याही स्वरूपात माजी विद्यार्थी शाळेला मदत करू शकतात. माजी न्यायमूर्ती भास्कर शेट्ये यांनी गुरुवर्य अच्युतराव व शंकरराव यांचे स्मारक व्हावे, अशी इच्छा व्यक्त केली. कोकण कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. श्रीरंग डॉ. कद्रेकर यांनी दहावीनंतर काय याबाबत मार्गदर्शन करण्याची सूचना केली. माजी जि. प. अध्यक्ष राजाभाऊ लिमये यांनी भारताबाहेरील विद्यार्थ्यांशी संपर्क साधून मेळावा घेण्याबाबत सूचना केली. विनायक हातखंबकर यांनी मेळाव्याचे सूत्रसंचालन केले. यावेळी माजी विद्यार्थी सुरेश लिमये यांनीही या उपक्रमासाठी लागेल ते सर्व सहकार्य देऊ, अशी ग्वाही दिली. दरवर्षी माजी विद्यार्थी मेळावा घ्यावा, असे मत मुस्तकीन साखरकर याने व्यक्त केले.
