अर्जुना परिसराचा विकास दोन वर्षे लाल फितीच्या कारभारात अडकून

0

राजापूर : पर्यटन व कृषी क्षेत्राच्या माध्यामातून अर्जुना नदी काठावरील उभय बाजूच्या गावांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी शासनाने तयार केलेला सुमारे 109 कोटी 94 लाख 50 हजाराचा आराखडा मागील दोन वर्षे लाल फितीच्या कारभारात अडकून पडल्याने समृध्द अर्जुना परिसराचे स्वप्न अद्याप तरी सत्यात उतरलेले नाही. तालुक्यातील सर्वात मोठी नदी म्हणून ओळाली जाणार्‍या अर्जुनाच्या काठावरील गावांना विकसित करुन त्यांना समृध्द बनवायचे असेल तर शासनाला प्रथम लाल फितीच्या विळयात सापडलेल्या या आराखड्याला बाहेर काढावे लागेल व त्याची तत्काळ अंमलबजावणी करावी लागेल राजापूर तालुक्याच्या पूर्व परिसरातून वाहणारी सर्वात मोठी नदी ही अर्जुना आहे. पूर्व परिसरातील अणुस्कुरा घाटात उगम पावणारी ही नदी पुढे पश्‍चिमेला अरबी समुद्राला जाऊन मिळते. या नदीच्या दोन्ही काठावर सुमारे 35 ते 40 गावे आहेत. अणुस्कुरा घाटात उगम पावणार्‍या या नदीचा समुद्रापर्यंतचा प्रवास हा एकूण 42 कि. मी. एवढा आहे तर नदीची रुंदी 35 मिटर, पायाची खोली सरासरी 3 कि. मी. आहे. या नदीच्या परिसरातील पाणलोट क्षेत्र 6500 हेक्टर एवढे आहे. या नदीच्या उजव्या काठावर कारवली, पाचल, रायपाटण,  खडीकोळवण, सौंदळ, चिालगाव, गोठणे दोनिवडे, शिळ, राजापूर, धोपेश्‍वर, पन्हळे, गोवळ,सोगमवाडी, बुरंबे तर डाव्या काठावर करक, तळवडे,ताम्हाणे रायपाटण, तुळसवडे, आडवली,  फुफेरे, आंगले, दोनिवडे, उन्हाळे, कोेंढेतड, शेढे, कणेरी, डोंगर, विलये, पडवे, चव्हाणवाडी, दळे, जुवे, जैतापुर या गावांचा सामावेश येतो. या संपूर्ण नदीच्या मार्गात 28 कि.मी. एवढा मोठ्या प्रमाणात गाळ साचलेला आहे.दरवर्षी सरासरी 4000ते 4100 मी.मी.एवढा पाऊस अर्जुना परिसरात पडतो मात्र एवढे असुनही दरवर्षी उन्हाळी दिवसात किरकोळ अपवाद वगळता अर्जुनाचे पात्र कोरडे ठणठणीत असते. कोकणात एवढा प्रचंड पाऊस पडूनही अशी विदारक स्थिती का निर्मांण झाली? या नदीचा प्रवाह बारमाही का वाहत नाही तर या नदीच्या मार्गातील अडथळा ठरणारा गाळ हेच प्रमुख कारण ठरले आहे. पूर्वी अर्जुनाच्या पात्रात ठिकठिकाणी असणारे तुडुंब पाण्याचे जलाशय आत साचलेल्या गाळाने भरुन गेले आहेत व त्याचा परिणाम पाणीसाठ्यावर झाला आहे 15-20 वर्षापूर्वी जेवढे पाण्याचे साठे असायचे ते आज पहावयास मिळत नाहीत. मग बारमाही या नदीला मुबलक पाणी रहाणार तरी कसे? काही वर्षांपूर्वी पावसाळा संपला की साधारणत: डिसेंबर – जानेवारी महिन्यांपर्यंत या नदीचा प्रवाह वाहता असायचा. पण अलिकडील काही वर्षांत पावसाळा समाप्त होत असतानाच नदीचा प्रवाह क्षीण होतो व त्यानंतर त्याचा वेग ही मंदावतो. पुढे कडाक्याच्या उन्हाळ्याात एका लहान धारेवर हा प्रवाह आपले अस्तित्व कसेबसे टिकवताना दिसतो. मात्र, अनेक ठिकाणचे पात्र ठणठणीत असते असेच चित्र पहावयास मिळते. शिवाय जो प्रवाह चालू असतो तो विविध मार्गांनी खराब करण्याचे काम काहीजणांकडून केले जाते. अशा परिस्थितीमुळे विद्यमान क्षणी उगमापासून ते समुद्र संगमापर्यंत अर्जुना नदीचा मार्ग खडतर झाला आहे.  नदीपात्रातील साचलेल्या गाळामुळेच पावसाळ्यात प्रचंड महापूर आल्यानंतर आजुबाजूच्या भागात पुराचे पाणी लांबपर्यंत जाऊन पसरते. शिवाय अर्जुनाचा पूर्वेकडील परिसर हा तीव्र उताराचा असल्याने पुराचे पाणी वेगाने निघून जाते. या नदीवर एक कटाक्ष टाकल्यास असे दिसेल उगमस्थानापासून बागवेवाडीपर्र्‍यंत सुमारे 10 ते 15 कि.मी.पर्यंत नदीला प्रचंड खळाळाट आहे. अर्जुनेच्या उगमावर जोरदार पर्जंन्यवृष्टी झाल्यास काही क्षणात वेगाने पुराचे पाणी पुढे सरकते. मात्र, सौंदळपासून पुढे या पाण्याची गती मंदावते व तशाच गतीने तो प्रवाह पुढे वाहत जातो. दरम्यान, हा प्रश्‍न मार्गी लागला असता तर आज तालुक्यातील महत्वपूर्ण अशा या नदीच्या दोन्ही काठावरील शेती व पर्यटनातून चांगले चित्र दिसले असते. अर्जुनाचा प्रवाह बारमाही सुरु झाला असता तालुक्यातील विकास प्रक्रियेत  मोलाची भूमिका बजावणार्‍या अर्जुनेच्या विकासाचा बनवलेला हा आराखडा लाल फितीच्या विळख्यातून बाहेर काढून त्यावर झटपट निर्णय झाल्यास  हा परिसरात विकासाच्या मार्गावर येण्यास मदत होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here